कोल्हापूर : तीनशेहून अधिक स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड याच्या तीन एजंटांना शनिवारी रात्री करवीर पोलिसांनी ताब्यात घेतले. यापैकी रेखा वरुटे (४५, रा. कळंबा, ता. करवीर) व सागर तराळ (वय ४३, रा, मांगूर, कर्नाटक) या दोन एजंटांना अटक केली असून, त्यांनी डॉ. गायकवाडला पेशंट पुरवल्याची कबुली दिली. अन्य एकाकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
कळंबा येथील थ्री स्टार लॉजमध्ये सुरू असलेल्या गर्भलिंग निदान रॅकेटचा करवीर पोलिसांनी भांडाफोड करून मनीषा कांबळे, अश्विनी शिंदे यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून डॉ. चंद्रकांत गायकवाडसह मदतनीस शब्बीर जैनुन हजारीचे नाव समोर आले. या दोघांना अटक केली असता, गायकवाडने सुमारे ३०० हून अधिक महिलांचे गर्भपात केल्याची धक्कादायक कबुली दिली. गर्भपात केलेल्या काही दाम्पत्यांची नावे समोर आली असून यामध्ये उच्चशिक्षित दाम्पत्यांचाही समावेश आहे. शनिवारी दिवसभरात १० पेक्षा जास्त दाम्पत्यांची चौकशी पोलिसांनी केली आहे.
स्वप्नीलसह तिघांचा शोध सुरू
गर्भलिंग निदान प्रकरणातील मुख्य सूत्रधार बोगस डॉक्टर स्वप्नील पाटीलसह एजंट किरण चव्हाण, संतोष कोळी या तिघांच्या शोधासाठी करवीर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी दिवसभरात काही ठिकाणांवर छापेमारी केली. स्वप्नीलने थ्री स्टार लॉजमधील १०२ व १०३ नंबरच्या रूम भाड्याने घेतल्या होत्या. चार तासांसाठी त्याने सात हजार रुपये भाडे लॉजमालक प्रदीप संकपाळ याला दिल्याची माहिती तपासात समोर आली. गर्भपातामध्ये यापूर्वी अश्विनी शिंदे आणि मनीषा कांबळे यांना अटक केली होती; तर शनिवारी रेखा वरुटे या तिसऱ्या महिला एजंटला अटक केली.
निदानासाठी २ हजार तर गर्भपातासाठी ३ हजार कमिशन
एजंट अश्विनी शिंदे हिने स्वप्नील पाटील याने गर्भलिंग निदान केलेल्या १० महिलांना गर्भपाताचा सल्ला दिला होता. या महिलांनी शब्बीर हजारीसोबत संपर्क करून गर्भपातासाठी गायकवाडकडे पाठवल्याची कबुली दिली. अश्विनी शिंदे हिने गर्भलिंग निदानासाठी दोन हजार तर गर्भपातासाठी तीन हजार असे पाच हजारांचे कमिशन एका पेशंटमागे मिळाल्याचेही सांगितले.