फुलेवाडी : रंकाळा तलावाच्या प्रदूषणाचा फटका जलचर प्राण्यांना बसत आहे. गेल्या पाच दिवसांत पाणी प्रदूषणामुळे तलावातील 12 राजहंस मृत्युमुखी पडले आहेत.
आठ वर्षांपूर्वी महापालिकेने पांढरा घाट परिसरात राजहंस आणून सोडले होते. तिथे बोटिंग सुरू झाल्यानंतर त्या राजहंसना वाचवण्यासाठी विजय साळोखे, आनंदा आठवले, महंमद शिकलगार, भारत सुतार, धनाजी लिंगम यांनी ते राजहंस रंकाळा परिसरातील धोबी घाटात आणून सोडले. त्यांनी स्वखर्चाने राजहंसाची खाण्याची व्यवस्था केली होती. राजहंसची संख्या वाढवण्यासाठी बाळू पाटील यांनी स्वखर्चाने पाच मादी राजहंस मुंबईवरून आणून तलावात सोडले. जवळपास 39 राजहंस रंकाळा परिसरात विहार करत होते; परंतु गेल्या पाच दिवसांत प्रदूषणामुळे यातील बारा राजहंस मृत्युमुखी पडले. तसेच अनेक करकोच पक्षीही मृत्युमुखी पडले आहेत. या अन्नातून विषबाधा झाल्याचे या राजहंसांचा मृत्यू झाल्याचा संशय जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या पर्यवेक्षकांनी व्यक्त केला आहे.
या मृत झालेल्या पक्ष्यांचे पोस्टमार्टम केल्यानंतरच खरे कारण समजेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, रंकाळा तलावात अनेक वेळा प्राणी प्रदूषणामुळे मासे, कासव इत्यादी जलचर मृत्युमुखी पडण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत; परंतु महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. जलचर प्राण्यांचे प्राण वाचविण्यासाठी महापालिकेने त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी रंकाळाप्रेमींकडून होत आहे.