कोल्‍हापूर : तुळशी विवाहासाठी बाजारपेठा विविध पूजा साहित्‍यांनी बहरल्‍या. (छाया : पप्‍पू अत्तार)
कोल्हापूर

Tulsi Vivah 2026 | तुळशी विवाह आज, बाजारपेठा सजल्या

पूजा साहित्य, तुळशीची रोपे, ऊस, सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : कार्तिक महिन्यातील पारंपरिक तुळशी विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठा विविध पूजा साहित्यांनी सजल्या आहेत. शनिवारी (दि. २१) घरोघरी पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह साजरा होणार असल्याने त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शुक्रवारपासूनच बाजारपेठांमध्ये नागरिकांची वर्दळ वाढली आहे. विवाहासाठी आवश्यक पूजा साहित्य, सजावटीच्या वस्तू आणि तुळशीच्या रोपांच्या खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू असल्याचे चित्र शहरातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.

तुळशी विवाहासाठी लागणारी तुळशीची वृंदावने, रोपे, ऊस, आवळा, चिंच, बोर, फुले, हार, हळद-कुंकू, अक्षता यांसह बाशिंग, चुनरी, छोटे मंगळसूत्र, बांगड्या आणि साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुळशी वृंदावनाच्या सजावटीसाठी रांगोळ्या, तोरणे आणि विद्युत रोषणाईच्या साहित्याचीही दुकानदारांनी मांडणी केली आहे.

तुळशीच्या रोपांना मागणी वाढली

हिरव्या तुळशीबरोबरच मंजिरी असलेल्या रोपांची विक्री होत आहे. लहान कुंड्यांपासून सजावटीच्या कुंड्यांपर्यंत विविध प्रकार ग्राहकांना पाहायला मिळत आहेत. नवीन तुळशी वृंदावनात रोप लावण्यासाठी काही नागरिकांकडून खरेदी केली जात आहे. पूजेचे साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांना खरेदी करणे सोयीचे ठरत आहे.

तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त

शुभ मुहूर्त : सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते रात्री ७ वाजून ४९ मिनिटे

गोधूली मुहूर्त : सायंकाळी ५ वाजून २५ मिनिटे ते ६ वाजून १३ मिनिटे

विवाहासाठीचे पूजा साहित्‍य

पूजा साहित्‍य : हळद-कुंकू, अक्षता, फुले, हार

विवाह साहित्‍य : बाशिंग, चुनरी, छोटे मंगळसूत्र, बांगड्या, साडी

नैवेद्य व परंपरा : ऊस, आवळा, चिंच, बोर

सजावटीसाठी : रांगोळी, तोरणे, विद्युत रोषणाई

तुळशीसाठी : नवीन रोपे, मंजिरी असलेली तुळस, आकर्षक कुंड्या व वृंदावने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT