Kolhapur Municipal Corporation mayor | महापौरपदासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच 
कोल्हापूर

Kolhapur Municipal Corporation mayor | महापौरपदासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच

विजयसिंह खाडे पाटील, प्रमोद देसाईंसह अर्धा डझन नावे चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेत महायुतीची सत्ता येणे जवळपास निश्चित असले तरी पहिला महापौर भाजपचा की शिवसेनेचा यावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महापौरपदाची निवड आता केवळ औपचारिक न राहता राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा ठरत आहे.

महायुतीतील सर्वाधिक जागा निवडून आलेल्या भाजपमध्ये महापौरपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेले विजयसिंह खाडे पाटील, प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय देसाई आणि वैभव कुंभार ही नावे जोरदार चर्चेत आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले, परंतु नागरिकांच्या मागास प्रवर्गाचा दाखला असलेले नगरसेवकही पात्र ठरणार आहेत. त्यामुळे रूपाराणी निकम यांच्यासह काही नावे चर्चेत आली आहेत.

2010 सालापासून कोल्हापूर महापालिकेचे महापौरपद सतत विविध प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित राहिले होते. त्यामुळे 15 वर्षांपासून सर्वसाधारण प्रवर्गातील नगरसेवकांना संधी मिळालेली नाही. यंदा महापौरपद सर्वसाधारणसाठी खुले राहील, अशी अपेक्षा होती. मात्र नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण पडल्याने ओबीसी प्रवर्गात उत्सुकता आणि स्पर्धा निर्माण झाली आहे.

भाजपमध्ये या मागास प्रवर्गाचे सुमारे अर्धा डझन उमेदवार असून, त्यात सलग दुसर्‍यांदा निवडून आलेले विजयसिंह खाडे पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. प्रमोद देसाई, वैभव कुंभार आणि विशाल शिराळे या नव्या चेहर्‍यांंचाही विचार सुरू आहे. महिला उमेदवाराला संधी देण्याचा निर्णय झाल्यास रूपाराणी निकम यांचे पारडे जड मानले जात आहे. शिवसेनेला पहिल्यांदा महापौरपद मिळाल्यास ओबीसी प्रवर्गातून संगीता सावंत, अश्कीन आजरेकर आणि अजय इंगवले ही नावे चर्चेत आहेत. मात्र, महापौरपदाचा पहिला मान भाजपला मिळणार की शिवसेनेला, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यभरात सुरू असलेल्या महापौरपदाच्या राजकारणाचे पडसाद कोल्हापूर महापालिकेतही उमटणार आहेत.

अनुभवी की नव्या चेहर्‍यांना संधी?

महापालिकेच्या सभागृहात यावेळी अनुभवी नगरसेवकांसह अनेक नव्या चेहर्‍यांची एंट्री झाली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी अनुभवाला प्राधान्य दिले जाणार की नव्या चेहर्‍याला संधी मिळणार, हा देखील एक महत्त्वाचा कळीचा मुद्दा ठरत आहे. पक्षांतर्गत हालचाली आणि वरिष्ठ नेत्यांकडून मिळणार्‍या संकेतांवरून नव्या चेहर्‍याला संधी देण्याबाबत पक्षात खलबते सुरू असल्याचे बोलले जात आहे.

महिलांना संधी मिळणार का?

गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ महापालिकेत महापौरपदी महिलाच विराजमान आहेत. नागरिकांचा मागासवर्ग पदासाठी महापौरपद आरक्षित असल्याने या प्रवर्गातील महिलांनाही संधी मिळू शकते. तसे झाल्यास रूपाराणी निकम, सुरेखा ओटवर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. परंतु सत्ताधारी पक्ष काय निर्णय घेतात यावर ते अवलंबून आहे. कारण गेल्या 10 वर्षांत पुरुष नगरसेवकांना हे पद भूषविण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे महिलांना यावेळी संधी दिली जाते की नाही याबाबत साशंकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT