कोल्हापूर : क्षयरोग हा जगातील सर्वाधिक जीवघेणा आजार असून भारत हा जगात सर्वाधिक टीबी रुग्णसंख्या असलेला देश आहे. देशात दर दीड मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. सन 2015 मध्ये हा मृत्यू दर 1 लाखामागे 32 होता. आरोग्य विभागाने राबविलेल्या विविध योजनांमुळे हा मृत्यू दर 15असा खाली आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जानेवारी ते 16 मार्च 2026 पर्यंत 444 क्षयरोगी रुग्ण आढळले असून 16 जण दगावले आहेत. आरोग्य विभागाने शोध मोहीम गतिमान केल्याने हे यश आले आहे.
क्षयरोग मुक्त भारताची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याकरिता शासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी आरोग्य विभागाकडून दिल्या जाणार्या सूचनांचे पालन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. 9 सप्टेंबर 2022 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान’ या महत्त्वाकांक्षी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. क्षयरुग्णांना दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांना ‘निक्षय मित्र’ बनून कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. जिल्ह्यातील सामाजिक संघटना, व्यक्तींनी मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हा क्षयरोग आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांनी केले आहे.
क्षयरोगाची कारणे
दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला.
संध्याकाळी येणारा ताप.
भूक न लागणे, वजन घटणे.
धाप लागणे.
फुफ्फुसाव्यतिरिक्त टीबीमध्ये मानेवर गाठी, लसिकाग्रंथींना सूज येणे.