कागल : पुणे-बेंगलोर महामार्गावर कागल बस स्थानकाच्या बोगद्यापासून काही अंतरावर डांबराचे बॅरेल भरलेल्या ट्रकने एका कारला धडक देऊन त्यानंतर दोन बैलगाड्यांना उडविले. पुढे जाऊन एका दुचाकीस्वारास पुन्हा धडक दिली. या तिहेरी अपघातामध्ये तिघांसह चार बैल गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. याबाबतची नोंद कागल पोलिसांत झाली आहे.
ट्रक (केए 22 डी 8571) कोल्हापूरहून बेळगावच्या दिशेने जात होता. कागल बसस्थानकाच्या पुढे काही अंतरावर आल्यानंतर या ट्रकने समोर जात असलेल्या कारला (एमएच 10 बीए 4541) मागून जोराची धडक दिली. कार दुभाजकामध्ये घुसली. त्यानंतर ट्रकने त्याच वेगाने पुढे जात रस्त्याच्या उजव्या बाजूने ऊस रिकामा करून परत जाणार्या दोन बैलगाड्यांना उडवले. दोन्ही बैलगाड्यांमधील बैलगाडी मालक रशीद गजबर शेख व कृष्णात गुंडू चव्हाण (दोघे रा. करनूर, ता. कागल) व दोन्ही बैलगाड्यांचे चार बैल गंभीर जखमी झाले आहेत.
त्यानंतर ट्रक त्याच वेगाने पुढे जाऊन दुचाकीने (एम एच09 डी टी 3704) जात असलेल्या सूरज रवींद्र बिडकर (रा. शाहू मिल शेजारी, कोल्हापूर) यास धडक दिली; मात्र भरधाव ट्रक येत असल्याचे पाहून त्यांनी दुचाकीवरून उडी मारल्याने ते बचावले; मात्र दुचाकी ट्रकच्या खाली सापडून चक्काचुर झाली. बैलगाड्या बरोबरच कारचेही मोठे नुकसान झाले. आयुब इस्माईल मुजावर (रा. चिकोडी) असे ट्रकचालकाचे नाव आहे महामार्ग पोलीस व कागल पोलीस यांनी वाहने बाजूला केली. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी बैलांवर जागेवरच पशुवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून प्राथमिक उपचार केले.