कोल्हापूर

कोल्हापुरातील विद्युत खांबाना तिरंगी लुक

Arun Patil

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरातील विद्युत खांब आता तिरंगी (ट्रायकलर) होणार आहेत. पर्यटनस्थळ विकास योजनेतून त्यासाठी 9 कोटी 64 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. शहरात प्रवेश करणार्‍या सर्व मार्गावरील विद्युत खांबांचा त्यात समावेश आहे. पूर्ण खांब बदलून त्याठिकाणी भारतीय झेंड्याच्या तिरंगी रंगातील खांब उभारण्यात येणार आहेत. या खांबाचा रंग चहुबाजूंनी तिरंगी दिसेल. परिणामी कोल्हापूरच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

श्री अंबाबाई मंदिर तसेच जोतिबा मंदिरासह अनेक प्राचीन मंदिरे असल्यामुळे कोल्हापुरात दररोज हजारो भाविक येतात. कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकचे केंद्र असल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत असतात. न्यू पॅलेस, रंकाळा तलावाबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन स्थळे आहेत. कोल्हापुरात हेरिटेज वास्तूबरोबरच शहर सौंदर्यात भरण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न होत आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत, जेणेकरून पर्यटनास चालना मिळून येथील उद्योग-व्यवसायात भर पडावी.

पहिल्या टप्यात 200 विद्युत खांब बदलण्यात येणार आहेत. या खांबासाठी 8400 मीटर केबल नव्याने टाकण्यात येणार आहे. त्यासाठी 4 कोटी 92 लाख 35 हजार 376 रु. मंजूर झाले आहेत; तर दुसर्‍या टप्यात 200 विद्युत खांब बदलले जाणार आहेत. त्यासाठी नवीन 8360 मीटर केबल टाकली जाणार आहे. दुसर्‍या टप्यासाठी 4 कोटी 72 लाख 43 हजार 656 रु. मंजूर करण्यात आला आहे. नवीन तिरंगी खांब काढल्यानंतर जुने खांब शहरात बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी आराखडा तयार केला असून तो सहा महिन्यांत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.

शहरातील 400 विद्युत खांब काढल्यानंतर ते खांब कोंडा ओळ ते संभाजीनगर (5), उमा टॉकीज ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल (7), बीएसएनएल टॉवर ते उचगाव नाका (40), क्रशर चौक ते शालिनी पॅलेस (42), पितळी गणपती ते रमणमळा चौक (17), टेस्टी कॉर्नर ते स्कायलाईन अपार्टमेंट (10), क्रशर चौक ते खर्डेकर चौक (35), ए वन गॅरेज ते संकल्पसिद्धी हॉल (25), चिवा बाजार ते शाहू चौक, फुलेवाडी रिंगरोड (40), चिवा बाजार ते साई मंदिर, कळंबा (50), अमर विकास ते जोतिर्लिंग कॉलनी (20), शेंडा पार्क ते आर. के. नगर (25) यासह इतर ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

शहरातील या प्रवेश मार्गावरील विद्युत खांब होणार तिरंगी

पहिला टप्पा…
तावडे हॉटेल ते दाभोळकर कॉर्नर : 113
वाशी नाका ते क्रशर चौक : 60
ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक : 27

दुसरा टप्पा…
कळंबा ते साई मंदिर : 22
शाहू जकात नाका ते शिवाजी विद्यापीठ : 76
फुलेवाडी ते रंकाळा : 58
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भवानी मंडप : 6
शिये पंचगंगा पूल ते शिये टोल नाका : 21
ताराराणी चौक ते उड्डाणपूल : 17

SCROLL FOR NEXT