कोल्हापूर

वटवृक्षांवर कुर्‍हाड…पर्यावरण होतेय उजाड; महामार्गांच्या कामात हजारो वटवृक्षांची कत्तल

दिनेश चोरगे

कोल्हापूर; सुनील कदम :  राज्यातील वेगवेगळ्या महामार्गांच्या कामांच्या दरम्यान अक्षरश: वृक्षसंहार सुरू आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या महाकाय, जुन्या आणि पर्यावरणाच्या द़ृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या वटवृक्षांचा फडशा पडताना दिसत आहे. नवीन वृक्षारोपनाची कामे केवळ कागदावर आणि फोटोतच दिसत आहेत. शिवाय नव्याने जी झाडे लावली जात आहेत, तीही पर्यावरणाच्या द़ृष्टीने निरूपयोगी!

सध्या राज्यात काही महामार्गांची कामे सुरू आहेत. यापैकी बहुतांश रस्त्यांच्या दुतर्फा शंभर-दोनशे-तीनशे वर्षांपूर्वी लावलेले हजारो वृक्ष होते. त्यातही वटवृक्षांचे प्रमाण लक्षणीय होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गांच्या कामांमुळे या मार्गांवरील हजारो जुने-पुराने महाकाय वटवृक्ष धारातीर्थी पडले आहेत.

पर्यावरणाच्या द़ृष्टिकोनातून वटवृक्षाचे अनन्यसाधारण महत्व आहे. एक वटवृक्ष म्हणजे एक स्वतंत्र पर्यावरणीय परिसंस्थाच समजली जाते. कारण या एका झाडावर अनेक पशु-पक्षांचे आणि अन्य वनस्पतींचे जीवनमान अवलंबून असते. वटवृक्षांच्या आजूबाजूला पर्यावरणाची एक अनोखी एक दुनिया वावरत असते. परंतु विशाल महाकाय वटवृक्ष नामशेष होत असल्याने ही दुनिया उजाड होत चालली आहे. परिसरात वडाच्या झाडाचे अस्तित्व असणे हे पर्यावरण समतोल असल्याचे द्योतक आहे.

महामार्गासाठी झाडे तोडली तर एका झाडाच्या बदल्यात दहा झाडे लावणे बंधनकारक आहे; मात्र हा नियम कागदावर किंवा फार फार तर फोटोंमध्ये राहात असलेले दिसत आहे. कारण नवीन झालेल्या कोणत्याही महामार्गाने शेकडो किलोमीटर प्रवास केला तरी एखादे मोठे झाड आढळून येत नाही की नवीन वृक्षारोपनाच्या कोणत्याही खुणा दिसून येत नाहीत. नियमानुसार नगाला नग म्हणून काही मंडळी नवीन झाडे लावण्याचा प्रयत्न करतात, पण काहीही करून जगावीत आणि प्रामुख्याने लागवडीनंतर जनावरांनी खाऊ नयेत म्हणून या निरूपयोगी झाडांची लागवड केली जात आहे. त्यामुळे नवीन महामार्गांच्या दुतर्फा देशी झाडांची लागवड करण्याची सक्ती हवी.

कुचकामी परदेशी झाडे

परदेशातून आलेल्या गुलमोहर, निलगिरी, सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अ‍ॅकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस, सप्तपर्णी, रेन ट्री या झाडांनी इथली जमीन नापीक केली असल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे. विदेशी झाडांच्या फुलात परागकण नाहीत. त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत. या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा जळणाशिवाय अन्य काहीही उपयोग होत नाही. रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड असे पक्षी या झाडांकडे फिरकतही नाहीत. परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा जनावरेसुद्धा खात नाहीत. माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदिक उपयोग नाहीत. ज्या झाडावर पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे.

बहुमोलाची स्वदेशी झाडे

पिंपळ, कडुलिंब, वड, चिंच, कवठ, बेल आणि आवळा ही देशी झाडे इथल्या पर्यावरणाच्या द़ृष्टिकोनातून बहुमोल समजली गेली आहेत. देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्ट्यात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात. ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे. त्यामुळे पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस, आवळा, आंबा, कवठ, बेल, कडुनिंब, मोह, पळस ही झाडे लावल्यास इथली जैवविविधताटिकून राहील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT