कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीत धावपट्टीसह भूसंपादन केले आहे, त्यातील नागरिकांसह झाडांचेही पुनर्वसन केले जात आहे. भूसंपादन करताना तोडली जाणारी झाडे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावली जात आहेत. सध्या चाफ्याची दोन झाडे लावण्यात आली असून, यानंतर वडाचीही झाडे लावली जाणार आहेत.
विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. याकरिता 64 एकर जागेचे भूसंपादन झाले आहे. ही जमीन विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात देताना त्यातील घरे, झाडेही काढली जाणार आहेत. यातील शक्य तितक्या झाडांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय प्रशासानाने घेतला आहे. त्यानुसार महिनाभरापूर्वी चाफ्याचे एका झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले होते, त्याला आता नव्याने पालवी फुटली आहे. मुडशिंगी परिसरातील दुसऱ्या चाफ्याच्या झाडाचे शुक्रवारी पुनर्रोपण करण्यात आले. यानंतर वडाचीही काही झाडे आहेत. त्यांचेही रोपण केले जाणार असल्याचे करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनीही भेट देऊन परिसराची पाहणी केली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा विधी अधिकारी ॲड. वैभव इनामदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ, तहसीलदार हणमंत म्हेत्रे, करवीरचे मंडल अधिकारी गणेश बरगे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.