Ichalkaranji tree falls petrol pump
इचलकरंजी : येथील मुख्य रस्त्यावर असणार्या जयहिंद मंडळासमोरील भारत पेट्रोल पंपावर झाड कोसळले. पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीच्या दुचाकीवर झाडाची फांदी पडल्याने नुकसान झाले. तर पंपाच्या मशिनवर असणार्या पत्र्याच्या शेडवर झाड पडल्याने पंपाचे मोठे नुकसान झाले नाही. इचलकरंजी शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंपाच्या कंपाऊडलगत असणारे झाड मुळासहीत कोसळले. ही घटना मंगळवारी (दि.१९) सकाळी पेट्रोल पंप सुरू असाताना घडली.
धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा नदीवरील जुना पूल सोमवारपासून वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. आज दुपारी 1 वाजता पाणी पातळी 58.3 फुटांवर होती. त्यामुळे नदीचे पाणी हळूहळू पात्राबाहेर येऊ लागले आहे. सलग सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या 24 तासांत जवळपास 5 फुटांनी पातळी वाढली असून मंगळवारी सकाळपासून एका तासात 3 इंचांनी पाणी पातळी वाढत होती. गणपती मंदिर परिसरात पावसाचे पाणी आले असून नदीचा घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. तसेच नदीघाटावरील महादेव मंदिरासमोर पुराचे पाणी आले आहे. जूना पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे मोठ्या पुलावरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. हुपरी व रेंदाळकडे जाणार्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.