कोल्हापूर

कोल्हापूर पूर्वपदावर; मंडई, वाहतूक व्यवस्था सुरू

दिनेश चोरगे

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याचा स्टेटस मोबाईलवर ठेवल्याच्या घटनेनंतर बुधवारी कोल्हापुरात उसळलेल्या दंगलीनंतर दुसर्‍या दिवशी गुरुवारी कोल्हापूर शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले.

स्टेटस प्रकरणावरून चार ते पाच दिवसांपासून शहर धुमसत होते. स्टेटस लावणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे पाहून मंगळवारी दुपारपासून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करून बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. या बंदवेळी जमाव हिंसक बनला व त्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. बुधवारी सायंकाळपर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता होती. गुरुवारी सकाळपासूनच शहरातील वातावरण पूर्वपदावर आले. छोटे व्यावसायिक, फेरीवाल्यांनी सकाळी सातपासूनच आपली दुकाने थाटली. ताराबाई रोड, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी रोड, महापालिका परिसर, बिंदू चौक, भाऊसिंगजी रोडवर सकाळपासूनच व्यवसाय सुरू झाले.

कपिलतीर्थ मार्केट, ताराबाई रोडवर गुरुवारी सकाळपासूनच व्यावसायिकांची लगबग सुरू झाली. भाविकांचा ओघ वाढू लागल्याने खाद्य पदार्थ, चहा, नाष्टा सेंटरच्या हातगाड्या, टपर्‍या सुरू झाल्या. कपिलतीर्थ मंडईतही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद होता.

अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी गर्दी

अंबाबाई मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सकाळपासूनच सुरू झाला. दिवसभर दर्शनासाठी गर्दी होती. भाविकांची ने-आण करण्यासाठी रिक्षा, वडाप वाहतूकही सुरू होती. बिंदू चौकातील वाहनतळावरही सकाळपासूनच वाहनांची वर्दळ सुरू झाली. रात्रीपर्यंत मंदिरात भाविकांची ही वर्दळ सुरू राहिली. गुरुवार असल्याने कॉमर्स कॉलेजवळील दत्तमंदिर, कुंभार गल्ली व गंगावेश येथील श्रीकृष्ण सरस्वती मंदीर, कोटीतार्थ मंदिरातही भाविक दर्शनासाठी येत होते.

वाहतूक व्यवस्थाही पूर्वपदावर

शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही सकाळपासूनच सुरू झाली. एसटी बसेस, केएमटी, रिक्षा तसेच वडाप वाहतूकही सुरू झाली. कॉलेज, क्लासला जाणार्‍या विद्यार्थ्यांची तसेच व्यवयाय, नोकरीसाठी ये-जा करण्यासाठी लोकांना ही सेवा उपयुक्त ठरली. दिवसभर या सेवा सुरू होत्या. शहरात येणार्‍या व शहराबाहेर जाणार्‍या सर्व प्रमुख रस्त्यावर गर्दी होती.

प्रवेशासाठी नागरिकांची लगबग

दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यार्थी आणि पालकांची प्रवेश प्रक्रियेसाठीची धावपळ पुन्हा सुरू झाली. बुधवारी दंगलीमुळे या धावपळीला थोडा ब—ेक लागला होता. तसेच विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठीही तहसीलदार कार्यालयामध्ये तसेच सेतू केंद्रामध्ये गर्दी दिसून येत होती. इंटरनेट बंद असले तरी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. शालेय साहित्यांची व गणवेशांची खरेदी करण्यासाठीही बाजारात गर्दी दिसून आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT