Ajra wall collapse | आजर्‍यात घर पाडताना भिंत कोसळली; प्राध्यापिका, विद्यार्थिनीचा अंत  
कोल्हापूर

Ajra wall collapse | आजर्‍यात घर पाडताना भिंत कोसळली; प्राध्यापिका, विद्यार्थिनीचा अंत

पुढारी वृत्तसेवा

आजरा : शहरातील आजरा-महागाव मार्गावर जुन्या घराचे साहित्य काढत असताना भिंत रस्त्याच्या दिशेने कोसळून महाविद्यालयीन प्राध्यापिका ज्योती नितीन कुंभार (42) आणि शाळकरी मुलगी वैष्णवी तुकाराम भोसले (13) यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला. वैष्णवीची आई व वसतिगृहाच्या अधीक्षक ललिता तुकाराम भोसले (45, सर्व रा. आजरा) या गंभीर जखमी झाल्या. सोमवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन्ही भिंतीच्यामध्ये जेसीबीमधून घराचे बडोदे, वासे भरण्याचे काम सुरू होते. काम सुरू असताना दोन्ही बाजूला वाहतूक व नागरिकांची ये-जा थांबली होती. यावेळी गटारीच्या बाजूला रिकामी जागा दिसल्याने वैष्णवी, आई ललिता व प्रा. ज्योती कुंभार जात होत्या. याचवेळी भिंत अचानक रस्त्यावर कोसळली. यामध्ये या तिघीही मातीच्या ढिगार्‍याखाली सापडल्या. स्थानिक कार्यकर्ते गौरव देशपांडे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने ढिगारा उपसून त्यांना बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, डॉ. सागर तेऊरवाडकर, डॉ. सुरजित पांडव यांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तपासणी केली असता दोघींना मृत घोषित करण्यात आले. या घटनेत ललिता भोसले या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठेकेदार, जेसीबी चालकावर गुन्हा दाखल

ठेकेदार अभिजित बाबूराव हुक्केरी, विनोद पांडुरंग मोहिते (दोघेही रा. आजरा) व जेसीबीचालक मिथुन चव्हाण (रा. विजापूर, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याबाबत सुनील पांडुरंग कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास युवराज धोंडे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT