अलखनूर फाटा : येथे जमखंडी-मिरज या आंतरराज्य मार्गावरील दुचाकी व माल ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. 
कोल्हापूर

Jaysingpur accident news | जयसिंगपूरच्या दाम्पत्यासह मुलीचा अपघाती अंत

पुढारी वृत्तसेवा

जयसिंगपूर : जमखंडी (जि. बागलकोट) येथे आजारी आईला भेटायला जात असताना मिरज-जमखंडी मार्गावर अलखनूर (ता. रायबाग, जि. रायबाग) फाट्यावर मालवाहू ट्रक व दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात दाम्पत्यासह त्यांच्या 7 वर्षांच्या चिमुरडीचा अंत झाला. या भीषण अपघाताची माहिती समजताच जमखंडीसह जयसिंगपुरात शोककळा पसरली. गिर्‍याप्पा ऊर्फ गिरीश हणमंत कुद्रोळी (वय 38) यांच्यासह पत्नी मंजुळा (28) व मुलगी आराध्या (वय 7, मूळ गाव जमखंडी, सध्या राहणार शाहूनगर, जयसिंगपूर,) यांचा मृत्यू झाला असून याबाबतची नोंद हारूगेरी पोलिसात झाली आहे.

गिर्‍याप्पा कुद्रोळी हे जयसिंगपूर येथून पत्नी मंजूळा व मुलगी आराध्या यांच्यासह दुचाकीवरून जमखंडी येथे असलेल्या आईची तब्येत पाहण्यासाठी जात होते. रायबाग तालुक्यातील अलखनूर गावाच्या हद्दीतील फाट्यावर असलेल्या करिसिद्धेश्वर देवस्थानाच्या वळणावर जमखंडीहून मिरजकडे जाणार्‍या मालवाहू ट्रकची दुचाकीला जोराची धडक बसून भीषण अपघात झाला. यात मंजुळा व आराध्या यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी असलेल्या गिर्‍याप्पा कुद्रोळी यांना स्थानिक नागरिक हारुगिरीच्या खाजगी रुग्णालयाकडे घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. धडक बसल्यानंतर दुचाकीवरील गिर्‍याप्पा कुद्रोळी यांच्या पत्नी मंजुळा सुमारे 10 फूट दूरवर फेकल्या गेल्या. तर चिमुरडी आराध्या ही ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत पावली. अपघातानंतर ट्रक चालकाने वाहन सोडून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच हारूगिरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेऊन पाहणी केली. शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद हारुगिरी पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास सुरू आहे.

घरी ठेवलेली दोन मुले झाली पोरकी

गिर्‍याप्पा कुद्रोळी हे जयसिंगपूर येथील एका खासगी संस्थेत तर पत्नी मंजुळा एका दुकानात काम करत होत्या. गिर्‍याप्पा यांनी गावी जाताना 7 वी व 10वीत शिकणार्‍या दोन मुलांना शाळा असल्याने जयसिंगपूर येथे घरीच ठेवले होते. ही दोन्ही मुले आता आईवडिलांच्या प्रेमाला पारखी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT