कोल्हापूर

कोल्हापूर : ट्रॅफिक जाममधून मुक्तता कधी; महापालिका, शहर वाहतूक शाखा ढिम्मच

दिनेश चोरगे

कोल्हापूर; डॅनियल काळे : शहरात योग्य नियोजनाच्या अभावामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडत आहे. बेशिस्त पार्किंग, बेभरवशाची सिग्नल व्यवस्था, वाहतूक पोलिसांचे वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी पावत्या फाडण्याकडेच जास्त लक्ष असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर येथे दोन्ही सिग्नलमध्ये 50 मीटरचेही अंतर नाही. त्यामुळे एक सिग्नल सुटल्यानंतर दुसर्‍या सिग्नलपर्यंत जाईपर्यंत पुन्हा तेथे थांबण्याची वेळ वाहनधारकांवर येते. महापालिका,भाऊसिंगजी रोड, स्टेशन रोड, पापाची तिकटी, शाहूपुरी, बाबुभाई परीख पूल येथे वाहतूक कोंडी नित्याचीच बनली आहे.

शहरातील सर्वाधिक वाहतूक असणारा रस्ता म्हणजे स्टेशन रोड होय. या रोडकडून शहरात येताना व्हिनस कॉर्नरकडून एक रस्ता फोर्ड कॉर्नरकडे जातो, तर दुसरा रस्ता कोंडाओळीकडे जातो. एस. टी. बसेस, केएमटी बसेस, वडाप, रिक्षा आणि दुचाकी, चारचाकी या रस्त्यावरून ये-जा करत असतात. फोर्ड कॉर्नरजवळचा सिग्नल महत्त्वाचा आहे. शहराच्या मध्यभागातील हा चौक आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची वर्दळ मोठी असते. येथे वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी असणारेे पोलिस बर्‍याचदा वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी पावत्या फाडण्यातच जास्त गुंग असतात. बर्‍याचदा या चौकामध्ये रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीमध्ये अडकतात. फोर्ड कॉर्नरच्या सिग्नल सुटला की, पुढे कोंडाओळीच्या सिग्नललाही थांबावे लागते. अ‍ॅटोमॅटिक सिग्नलच्या वेळाही बर्‍याचदा चुकलेल्या असतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होते.

अयोध्या टॉकी ते फोर्ड कॉर्नर हा रस्ता मोठा असूनही पार्किंगची बेशिस्त वाहतूक कोंडीचे महत्त्वाचे कारण आहे. वाहने कशीही पार्किंग केली जातात. बर्‍याच ठिकाणी डबल पार्किंगही केले जाते. त्यामुळे याबाबतीत वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. हीच परिस्थिती महाराणा प्रताप चौक ते व्हिनस कॉर्नर रस्त्यावर दिसून येते. शहरातील सर्वच रस्त्यांवर बेशिस्त बेकायदेशीर फेरीवाल्यांचेही प्रमाणही वाढले आहे.

SCROLL FOR NEXT