कोल्हापूर : शिवरायांच्या शौर्याचा इतिहास सांगणार्या पोवाड्यांचा खडा सूर, डफावरची थाप, हलगीचा ठेका, अंगावर रोमांच उभे करणारी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, शिवकाळातील आठवणींना उजाळा देणारी शिवकालीन शस्त्रांची प्रदर्शने, शिवाजी महारांजांच्या जीवनातील प्रसंग मांडणारे देखावे, शिवरायांच्या प्रतिमा, फलक अशा वातावरणाने शिवजयंतीची पूर्वसंध्या शिवमय झाली. मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती साजरी केली जाणार आहे. यानिमित्ताने कोल्हापूर शहरातील विविध संस्था, तालीम मंडळे यांच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संयुक्त राजारामपुरी तरुण मंडळ, संयुक्त मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळ, पंचगंगा शुक्रवार पेठ तरुण मंडळ, छत्रपती शिवाजी चौक येथील श्री शहाजी तरुण मंडळ, रंकाळा टॉवर परिसर येथे शिवजयंती निमित्त पोवाडा, मर्दानी खेळ, व्याख्याने, प्रदर्शने, देखावे आयोजित केले आहेत. या परिसरात कोल्हापूरकरांची गर्दी होत असल्याने सारा परिसर शिवमय वातावरणाने भारावून गेला आहे.
संयुक्त मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीने मिरजकर तिकटी येथे सोमवारी शाहिरांनी पोवाड्याचे सादरीकरण केले. तसेच लोककलांचे कार्यक्रम सादर करण्यात आले. सायंकाळी सात वाजता महाद्वार स्वामी भजनी मंडळाच्या वतीने कीर्तनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठेच्या वतीने शिवकालीन वेशभूषा स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या.
संयुक्त मंगळवार पेठेच्या वतीने मंगळवारी सकाळी 8 वाजता जन्मकाळ सोहळा व दुपारी साडेचार वाजता मिरजकर तिकटी येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. संयुक्त पंचगंगा शुक्रवार पेठेतर्फे सकाळी 9 वाजता जन्मकाळ सोहळा होणार आहे. सकाळी 7 वाजता शिवज्योत आगमन सोहळा, तर सकाळी 9 वाजता शिवजन्मकाळ सोहळा साजरा होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता शिवशाहीर दिलीप सावंत यांचा पोवाडा, रात्री साडेआठ वाजता ‘वाघनखं’ हे नाटक होणार आहे.
अक्षयतृतीयेच्या दिवशी पारंपरिक शिवजयंती उत्सव कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रमुख रस्ते, चौक येथे भगवे झेंडे, शिवप्रतिमा उभारल्या जातात. यावर्षीही शहरातील अनेक भागात भगवे झेंडे, पताके, शिवप्रतिमा यांनी लक्ष वेधले आहे. तसेच बाजारपेठेत भगवे झेंडे खरेदी करण्यासाठी बालचमूसह तरुणाईची गर्दी होत आहे.