पन्हाळा; पुढारी वृत्तसेवा : भारतात कामगारांच्या संरक्षणाबाबत देश पातळीवर ज्या गोष्टी घडत आहेत. त्यातून आपली कामगार चळवळ कशी टिकवायची, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. त्यासाठी कामगार संघटनांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणावा,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या वतीने पन्हाळा येथे आयोजित तीन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी आमदार पाटील म्हणाले की, कामगार कायद्याविरोधात म्हणावी, तशी चळवळ उभी राहिली नाही. पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या हक्कासाठी सरकारची कोंडी केली. अशा प्रकारची कामगारांकडून चळवळ होत नाही. या देशात कामगारांचे हक्क मर्यादित करण्याचे काम होत आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे. व देशातील कामगार आंदोलनात सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
वेगवेगळ्या साखऱ कारखान्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत. महाराष्ट्र साखर कामगारांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाकरिता कारखान्यांनी साखर पोत्यामागे एक किंवा दोन रुपये जमा करून ठेवले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही कामगारावर संकट आल्यास त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळेल. तसेच साखर कामगारांच्या त्रुटी दूर करण्यासाठी शरद पवार यांच्या रूपाने एक मोठी ताकद चळवळीच्या मागे आहे, असेही ते म्हणाले.
विठ्ठल कोतेकर यांनी कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी समृद्धीची मानसिकता, तर ए .पी. चौगुले यांनी कामगार हक्क व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. शामराव कुलकर्णी यांनी कामगार चळवळीचे भवितव्य या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे कार्यकारणी सदस्य शंकरराव भोसले, तात्यासाहेब काळे, रावसाहेब पाटील, अविनाश आपटे आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?