सरूड : शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक विशाळगड पायथा व संपूर्ण किल्ला परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी किल्ला व किल्ल्यावरील दर्गा, देवदेवतांच्या दर्शनासाठी येणारे भक्त, पर्यटक व्यक्तींची कसून चौकशी करण्याचे आदेश तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी नियुक्त चौकशी पथकांना दिले आहेत.
निवासी नायब तहसीलदार गणेश लव्हे, नायब तहसीलदार (निवडणूक) नरेंद्र गायकवाड या प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पंचायत समिती, पोलिस, वन विभाग, अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागातील अधिकारी व कर्मचारी मिळून प्रत्येकी सातजणांची दोन चौकशी पथके नियुक्त केल्याची माहिती तहसीलदार चव्हाण यांनी दिली. गडाच्या पायथ्याशी तैनात पथक नेमून दिलेल्या कालावधीत आणि जबाबदारीप्रमाणे पर्यटकांची झाडाझडती, चौकशी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विशाळगड किल्ल्याच्या पायथा परिसरातील गजापूर येथील हिंसाचार घटनेला तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर किल्ला व परिसरात जारी करण्यात आलेली पर्यटन बंदी मंगळवारी (ता. 7) सशर्त उठविण्यात आली. गडवासी, गडप्रेमी, विविध पक्ष, सामाजिक संघटना आदींचा वाढता दबाव आणि पाठपुराव्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या (आठ तास) कालमर्यादेत पर्यटनास सशर्त परवानगी दिली आहे. यावर गडवासीयांना काहीअंशी न्याय आणि दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त करीत शेकापसह समविचारी पक्ष, संघटना प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
तत्पूर्वी, स्थानिक शाहूवाडी पोलिस प्रशासनाने 18 आणि 26 डिसेंबर 2024 रोजी सादर केलेल्या अहवालात विशाळगड किल्ल्यावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे कळविले आहे. शिवाय भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे पुढील 30 दिवस बंदी आदेश लागू करण्याबाबत अहवालात विनंतीही केली आहे. साहजिकच ‘अलर्ट’ प्रशासनाने ‘स्ट्रिक्ट वॉच’चा पवित्रा घेतला आहे. यासाठी दोन पथकांची स्थापना करून प्रत्येकी एक नायब तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत अन्य विभागातील प्रत्येकी सहाजणांचा चमू कार्यरत राहणार असून एक पथक सलग पंधरवडाभर गडाच्या पायथ्याशी ठाण मांडून पर्यटकांची तपासणी करणार आहे.
आदेशाच्या अनुषंगाने पर्यटकांना निर्धारित वेळेतच व्यवस्थित चौकशी करून गडावर सोडले जाणार आहे. गडावर दाखल पर्यटकांना सायंकाळी पाचनंतर थांबता किंवा मुक्काम करता येणार नाही. संघटना, जमावाला कोणत्याही धार्मिक अथवा अन्य कार्यक्रमासाठी पोलिस तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेची विहित परवानगी घ्यावी लागेल. अप्पर जिल्हा दंडाधिकार्यांनी जारी केलेल्या (26 डिसेंबर) बंदी आदेशाचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गड व परिसरात कोणत्याही प्रकारचे मांसाहारी पदार्थ सोबत नेता येणार नाही. तथा मांस शिजवून खाता येणार नाही. पर्यटक व्यक्तीकडून मद्यपान, मद्यविक्री, मद्य वाहतूक करता येणार नाही. यासाठी पथकातील नियुक्त अधिकारी, कर्मचार्यांना सतर्कतेच्या विशेष सूचना देण्यात आलेल्या आहेत.