रविराज वि. पाटील
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले भुदरगड आता केवळ इतिहासप्रेमींचेच नव्हे, तर साहसी पर्यटकांचेही आकर्षण ठरणार आहे. भुदरगड वन विभागाच्या पुढाकारातून येथे पॅराग्लायडिंगचा उपक्रम लवकर सुरू होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
आकाशात भरारी घेण्यासाठी किल्ला सज्ज
या उपक्रमांतर्गत पर्यटकांसाठी दोन पॅराशूट आणि दोन पॅरामोटरच्या साहाय्याने आकाश सफरीची अनोखी अनुभूती घेता येणार आहे. यासाठी हिमाचल प्रदेशातून अनुभवी पायलट तसेच उपकरणे भुदरगडला दाखल झाली आहेत. विमानातील इंधनाचा वापर करून हे उड्डाण केले जाणार असून, एअर ट्रॅफिक कॉरिडोरनुसार निश्चित उंचीवरून किल्ल्याभोवतीचा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना आकाशातून पाहण्याची संधी मिळणार आहे.
ट्रायलला हवामानाचा अडथळा
सोमवारी या प्रकल्पाची पहिली ट्रायल घेण्याचे नियोजन होते. अचानक बदललेल्या हवामानामुळे ती पुढे ढकलावी लागली. दरम्यान, ग्राऊंड तयारी व सुरक्षेच्या चाचण्या युद्धपातळीवर सुरू आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे 40 लाख रुपयांचा निधी खर्च होणार असून, सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
स्थानिकांना प्रशिक्षणाची संधी
हिमाचल प्रदेशातील पायलट काही दिवस भुदरगड येथे थांबणार असून, धाडसी व होतकरू स्थानिकांना प्रशिक्षणासाठी हिमाचलला पाठविण्यात येणार आहे. भविष्यात स्थानिक पातळीवर पायलट तयार होऊन हा उपक्रम स्वयंपूर्ण स्वरूपात सुरू राहावा, असा वन विभागाचा प्रयत्न आहे.
किल्ल्यावर नव्या पर्यटन सुविधा
पर्यटन विकासाच्या द़ृष्टीने किल्ल्यावर अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तलावाच्या परिसराचे सुशोभीकरण, तळ्याकडे जाणारा रस्ता व मनोरा, पर्यटकांसाठी विसाव्याच्या झोपड्या, बोटिंग सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या सर्वांच्या जोडीला आता पॅराग्लायडिंगचा उपक्रम सुरू झाल्यास भुदरगड किल्ला हा साहसी पर्यटनाचा नवा केंद्रबिंदू ठरणार आहे.
भुदरगड किल्ला : इतिहास, निसर्ग आणि आता आकाश सफरीचे केंद्र
या प्रकल्पामुळे गडाचे सौंदर्य न्याहाळता येणार आहे. इतिहास आणि आधुनिक पर्यटनाची सांगड घालत भुदरगड पर्यटनाचा नवा आरंभ होणार आहे.