Radhanagari Dajipur Wildlife Sanctuary | दाजीपूर अभयारण्यात ‘राणोजी’चे दर्शन! 
कोल्हापूर

Radhanagari Dajipur Wildlife Sanctuary | दाजीपूर अभयारण्यात ‘राणोजी’चे दर्शन!

पर्यटक सुखावले; ‘होळीचा सडा’ परिसराची पट्टेरी वाघाला भुरळ

पुढारी वृत्तसेवा

नंदकुमार गुरव

राधानगरी : राधानगरी-दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी खुले झाल्यानंतर जंगल सफारीच्या दुसर्‍याच दिवशी पर्यटकांना ‘एसटीआर १०’ तथा ‘राणोजी’ या पट्टेरी वाघाचे दर्शन घडले. सोमवारी (दि.२) सकाळी सातच्या सुमारास ‘वाघाचे पाणी’ परिसरातील ‘होळीचा सडा’ येथे झुडपाआड बसलेला वाघ दिसताच पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला.

विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या पर्यटन हंगामातील सफारी सुरू करण्यात आली. सकाळच्या सत्रात प्रसाद कोरगावकर पर्यटकांना घेऊन सफारीसाठी जात असताना ‘वाघाचे पाणी’ परिसरातील मार्गावर अचानक वाघ दिसला. वाघाने सुमारे दोन मिनिटे पर्यटकांना दर्शन दिल्यानंतर जंगलाच्या दिशेने धाव घेतली. नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरणारा वाघ पाहण्याचा अनुभव पर्यटकांसाठी अविस्मरणीय ठरला.

सह्याद्री ते कोकण, कर्नाटकपर्यंत व्याघ्रभ्रमण मार्ग

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चांदोली, राधानगरी अभयारण्य, तिलारीचे वनक्षेत्र, भीमगड अभयारण्य, काली व्याघ्र प्रकल्प आणि दांडेली परिसरातील जंगले व्यापक पर्यावरणीय क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. या वनक्षेत्रांतील सुरक्षित संपर्क मार्ग वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक हालचालींसाठी उपयुक्त ठरतात. अन्‍न, पाणी, प्रजनन आणि सुरक्षित अधिवासाच्या शोधात वाघांना एका जंगलातून दुसर्‍या जंगलात जाण्याची गरज असते. अशा दोन वनक्षेत्रांना जोडणार्‍या सुरक्षित मार्गांना ‘व्याघ्रभ्रमण मार्ग’ किंवा ‘टायगर कॉरिडॉर’ म्हटले जाते.

यंदाच्या हंगामात सफारीच्या पहिल्याच दिवशी नऊ वाहनांना जंगलात जाण्यास परवानगी देण्यात आली. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत निश्चित वेळापत्रकानुसार वाहने सोडली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT