कोल्हापूर : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत. मध्यवर्ती चौक, धार्मिकस्थळांसह बाजारपेठा, बस, रेल्वेस्थानक या ठिकाणी साध्या वेशातील पोलिसांचा पहारा ठेवण्यात येत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाईच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर शहर, जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होण्याची शक्यता असल्याने महामार्गासह शहरांतर्गत रस्त्यांवर विशेष पथके नियुक्त करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिल्या आहेत. दारू तस्करीच्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या संशयितांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. संशयितांच्या छुप्या अड्ड्यांची तपासणी करण्याबाबतही प्रभारी अधिकार्यांना बजावण्यात आले आहे. पुणे-बंगळूर तसेच रत्नागिरी-नागपूर महामार्गावर ठिकठिकाणी तपासणी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून धिंगाणा, गोंधळ घालणार्या तळीरामांविरुद्ध खटले दाखल करण्यात येणार आहेत. संबंधितांची वाहने जप्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परिसर, शेतात जेवणावळीच्या पार्ट्या होत असतात. या ठिकाणी उघडपणे ओपन बार निदर्शनास आल्यास सर्वांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मद्यधुंद अवस्थेत शहरातून भरधाव वाहने हाकणार्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे शहर नियंत्रण वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितले. शहरात प्रमुख चौकाचौकांत वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. रात्री उशिरापर्यंत वाहन तपासणीसह नाकाबंदीही करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी शहरातील राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. कायद्याचे उल्लंघन करणार्यांची गय करू नका, असेही त्यांनी बजावले आहे. शहरातील मध्यवर्ती दसरा चौक, बिंदू चौक, सीपीआर चौक, व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोड, ताराराणी चौक, तावडे हॉटेल परिसरासह लक्ष्मीपुरी, राजारामपुरी या ठिकाणीही बंदोबस्त ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.