कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहर, जिल्ह्यात तरुणाईकडून जय्यत तयारी सुरू असतानाच ‘थर्टी फर्स्ट’ला कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी कोल्हापूर पोलिस दलाने खबरदारी घेतली आहे. शहर, जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. साध्या वेशात पोलिसांची पथके नियुक्त करण्यात येत आहेत. महामार्गावर नाकाबंदी करण्यात येत आहे. ओपन बारविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. नशेच्या धुंदीत हुल्लडबाजी करणार्यांची कोठडीत रवानगी होणार आहे.
जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूका नुकत्याच झाल्या आहेत. या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांसह समर्थकांचा थर्टी फर्स्टचा जंगी बेत ठरत आहे. त्यात कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासून मुठी सैल केल्याने थर्टी फर्स्टला जंगी बार उडवून देण्यासाठी समर्थक कार्यकर्त्यांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत.
महापालिका क्षेत्रात आचारसंहिता जारी झाल्याने कोल्हापूर, इचलकरंजीमध्ये आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही तसेच शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलिस ठाण्यांतर्गत प्रभारी अधिकार्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी, चौकात विनापरवाना साऊंड सिस्टीमचा दणदणाट आढळून आल्यास तत्काळ यंत्रसामग्री जप्त करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.
शहर, जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाकडून साध्या वेशातील पथके नियुक्त करण्यात येत असल्याचे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. संबंधित पथकामार्फत रात्रभर वॉच राहील. गैरप्रकार आढळल्यास संबंधितावर खटले दाखल करून त्याची कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालविणार्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्याही सूचना त्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह जिल्ह्यात प्रभारी अधिकार्यांना दिल्या आहेत.
शहरात चौकाचौकांत बंदोबस्त
निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, शांतता-सुव्यवस्थेला बाधक स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी कोल्हापूर पोलिस दलाने थर्टी फर्स्टला बंदोबस्ताचे व्यापक नियोजन केले आहे. शहरातील मध्यवर्ती चौकाचौकांत बुधवारी (दि. 31) सकाळपासून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षकांसह सहायक व उपनिरीक्षकांना याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या आहेत, असेही सांगण्यात आले.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्ह्यात पथके
बनावट दारू तस्करी रोखण्यासाठीही पुणे- बंगळूर तसेच रत्नागिरी-नागपूर महामार्गावर ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानेही महामार्गावर प्रमुख 9 भरारी पथकांशिवाय जिल्ह्यात विविध ठिकाणी 25 पथके नियुक्त केली आहेत. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी ही माहिती दिली.