नंदकुमार गुरव
राधानगरी : गव्यांच्या मुक्त संचारासाठी प्रसिद्ध असलेल्या राधानगरी-दाजीपूर अभयारण्याच्या पर्यटनाला सध्या चांगलीच उभारी मिळाली आहे. मागील आठवड्यात पर्यटकांना वाघाचे दर्शन झाल्याने दाजीपूरच्या जंगलाविषयी पर्यटकांमध्ये कुतूहल वाढले आहे. वाघाच्या अस्तित्वासह समृद्ध वनसंपदा, धुक्याची दुलई, अथांग जलाशय आणि विविध वन्यजीवांचा निसर्गमेळ अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे तसेच कर्नाटकातून पर्यटकांची पावले दाजीपूरकडे वळत आहेत.
गव्यांच्या कळपांबरोबरच अस्वल, भेकर, कोल्हे, विविध प्रजातींचे पक्षी, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि सापांचे दर्शन पर्यटकांना होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून सफारीदरम्यान वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा आणि अधूनमधून होणार्या दर्शनामुळे या अभयारण्याची ओळख वन्यजीवप्रेमींच्या वर्तुळात अधिक ठळक झाली आहे.
दररोज १५ ते १६ सफारी गाड्यांची जंगलवारी
वन विभागामार्फत पर्यटकांसाठी सफारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दररोज साधारण १५ ते १६ सफारी गाड्या पर्यटकांना घेऊन जंगल सफारीसाठी रवाना होत आहेत. दोन सत्रांत शुल्क भरून पर्यटकांना जंगलातील विविध निसर्गस्थळांचा आनंद घेता येतो. सांबर कुंड, सावराई सडा, शिवगड, मुरडा बांबरी, झांजूचे पाणी, हाडक्याची सरी, ठक्याचा वाडा, हसणे पॉईंट, धरणाचे बॅकवॉटर, कोकण दर्शन, उगवाईदेवी मंदिर, फुलपाखरू उद्यान आणि शाहू स्मृती केंद्र ही पर्यटकांची आकर्षणस्थळे ठरत आहेत.
दाजीपूरच्या जंगल परिसरात आणि जलाशयाच्या काठावर निसर्गरम्य वातावरणात वेळ घालवण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. काही पर्यटक घरूनच डबे आणून निसर्गाच्या सान्निध्यात वनभोजनाचा आनंद घेत आहेत. अनेक कुटुंबे स्थानिक हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आस्वाद घेत आहेत.
वाघाच्या दर्शनाने निर्माण झालेले आकर्षण, वन्यजीवांची विविधता आणि निसर्गसौंदर्य यामुळे दाजीपूर अभयारण्य आता निसर्ग पर्यटनाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातूनही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत आहेत. वन विभागामार्फत सफारीची व्यवस्था करण्यात आली असून, पर्यटकांनी जंगलातील वन्यजीवांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. वन्यजीवांचे संरक्षण आणि निसर्गाचा आनंद यांचा समतोल राखत पर्यटनाचा आनंद घ्यावा.राजेंद्र घुणकीकर, वनक्षेत्रपाल वन्यजीव, दाजीपूर