Udagiri Kalamma Devi Temple
कोल्हापूर : सह्याद्रीच्या दाट जंगलातील एक अद्भुत गोष्ट समोर आली आहे. ही कोणती अंधश्रद्धा नाही. मात्र, इथल्या नागरिकांची श्रद्धा, परंपरा आणि जंगलाचा राजा यांचा अनोखा संगम मानावा लागणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी गावात काळम्मादेवीच्या यात्रेला दरवर्षी हजारो भाविक येतात. पण या यात्रेचा आणखी एक खास पाहुणा असतो, तो म्हणजे जंगलाचा राजा वाघ ! होय... आपण बरोबर ऐकलात. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान परिसरातील उदगिरी गावात धुलीवंदनाच्या दिवशी काळम्मादेवीची भव्य यात्रा भरते.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या गावात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर वनविभागाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जातो. गस्त पथके, ट्रॅप कॅमेरे आणि सतत निरीक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण जंगल परिसरावर लक्ष ठेवले जाते.
दरम्यान, गेल्या चार वर्षांत यात्रेच्या काळात मंदिर परिसरात वाघांच्या हालचालींची नोंद झाली आहे. 2024 आणि 2025 मध्ये 'सेनापती' या नर वाघाचे ठसे येथे आढळले होते. तर यावर्षी कोयना अभयारण्यातून फिरत आलेल्या ‘बाजी’ या वाघाचे चित्र ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झाले आहेत, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण यांनी 'पुढारी न्युज'शी बोलताना दिली आहे.
उदगिरीत काळम्मादेवीची यात्रा आणि वाघांचे दर्शन, हा योगायोग नाही. तर सह्याद्रीतील मानव आणि वन्यजीवांच्या सहअस्तित्वाचा अनोखा नमुना मानला जातो. श्रद्धा, निसर्ग आणि संवर्धनाचा हा सुंदर संगम सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.