वाघ आल्याच्या फोन कॉलने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडविली. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापूर : वाघ आल्याचा फोन कॉल अन् प्रशासनाची तारांबळ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापुरात नागाळा पार्कातील एका महाविद्यालयात वाघ आल्याच्या फोन कॉलने प्रशासनाची सोमवारी (दि. 30) पहाटेपासून सकाळपर्यंत चांगलीच तारांबळ उडविली. वनविभाग, महापालिका अग्निशमन दल आणि पोलिसांनी महाविद्यालय व परिसराचा कोपरा अन् कोपरा तपासला. सीसीटीव्हीची तपासणी केली; पण वाघ आढळला नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. फोन कॉल करणार्‍या वॉचमन कुटुंबाकडे विचारणा केली असता वाघाच्या डरकाळीचा आवाज आल्याने फोन केल्याचे त्यांनी सांगितले; मात्र कुत्र्यांच्या गुरगुरण्याला त्यांनी वाघाची डरकाळी समजली असल्याची शक्यता अधिकार्‍यांनी व्यक्त केली.

पहाटे 4.30 वाजता कुत्र्यांचे भुंकणे अन् अधिकार्‍यांची धावपळ...

नागाळा पार्कातील एका महाविद्यालय परिसरात बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी वॉचमन कुटुंब राहत आहे. बांधकामाच्या ठिकाणी सोमवारी पहाटे 4.30 च्या सुमारास मोठ्या प्रमाणात कुत्री भुंकत होती. त्यामुळे वॉचमन कुटुंबीय उठले. काहीवेळाने त्यांना वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. त्यामुळे भयभीत होऊन वॉचमनने 112 या नंबरवर पोलिसांना कॉल करून महाविद्यालयात वाघ आल्याचे कळविले. पोलिसांनी तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांना घटनेची माहिती दिली. पोलिस व जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिकेच्या अग्निशमन दल व वन विभागाला कळविण्यात आले.

चार तासांच्या शोधमोहिमेनंतर वाघ आला नसल्याचे स्पष्ट...

अग्निशमन दलाचे जवान, वन विभागाचे अधिकारी, पोलिस तत्काळ नागाळा पार्कातील त्या महाविद्यालयात पोहोचले. फोन केलेल्या वॉचमन कुटुंबाला जाऊन भेटले. त्यांनी वाघाडी डरकाळी ऐकल्याचे सांगितले. त्यामुळे अधिकारी, जवान अन् पोलिसांनी वाघाचा शोध सुरू केला. सुमारे चार तास शोध घेतल्यानंतरही वाघ किंवा वाघाचे ठसे आढळले नाहीत. सीसीटीव्हीमध्येही वाघ असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. सकाळी 8.30 वाजता सर्व अधिकारी, पोलिस, अग्निशमनचे जवान घटनास्थळावरून निघून गेले. दरम्यान, पहाटेपासूनच परिसरात वाघ आल्याची अफवा पसरली. परिणामी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी पांगविली. वाघ आल्याची अफवा व गर्दीमुळे महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT