आशिष शिंदे
कोल्हापूर : पावसाळ्यात होणार्या विजांच्या कडकडाटाचा केवळ पृथ्वीवरच नाही, तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 60 ते एक हजार किलोमीटर उंचीवर वातावरणातील वरच्या थरावर (आयनोस्फिअर) ही परिणाम होतो. यामुळे मोबाईल सिग्नल यंत्रणा, जीपीएस व सॅटेलाईट नेव्हिगेशनवर परिणाम होण्याचा धोका वाढत असल्याचे सिद्ध करण्यात संशोधकांना यश आले आहे. हे आंतरराष्ट्रीय संशोधन इस्रोच्या मदतीने कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमच्या संशोधकांनी केले आहे.
आकाशात जेव्हा जोरात विजा चमकतात, तेव्हा त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. विजेच्या या प्रवाहामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हजार किलोमीटर आकाशात वातावरणातील ‘टोटल इलेक्ट्रॉन कंटेंट’ (टीईसी) मध्ये सुमारे 0.05 ते 0.80 टीईसी युनिटस्पर्यंत बदल नोंदवण्यात आला. विजा चमकल्यानंतर साधारण 2 ते 35 मिनिटांच्या कालावधीत आयनोस्फिअरमध्ये हे बदल दिसून येतात. विजेची तीव—ता (करंट इंटेनसिटी) जितकी जास्त असते, तितका या इलेक्ट्रॉनच्या घनतेवर होणारा परिणाम अधिक असतो, असे संशोधकांनी सांगितले. कोल्हापूर आणि इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या या शोधामुळे आता वादळी हवामानात सॅटेलाईट सिग्नलमध्ये होणारे बदल समजून घेणे सोपे होणार आहे.
यासाठी इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे (एनआरएससी) ‘लाइटनिंग डिटेक्शन सेन्सर नेटवर्क’ आणि जीपीएस (जीएनएसएस) डेटाचा वापर करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ परिसरातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम’ आणि जयसिंगपूर कॉलेजच्या संशोधकांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून हे संशोधन केले.
मोबाईल व जीपीएस सिग्नल याच थरातून येतात
आपली मोबाईल कम्युनिकेशन यंत्रणा, जीपीएस आणि सॅटेलाईट नेव्हिगेशन हे सर्व आयनोस्फिअरमधील इलेक्ट्रॉनच्या स्थितीवर अवलंबून असते. हे सिग्नल आयनोस्फिअरमधून पृथ्वीवर पोहोचतात. त्यामुळे या थरात बदल झाले, तर सिग्नलवर परिणाम होऊ शकतो. जर विजांमुळे यात अचानक बदल होत असतील, तर त्याचा परिणाम सॅटेलाईट सिग्नलच्या अचूकतेवर होऊ शकतो.
सॅटेलाईट कम्युनिकेशन, नेव्हिगेशन यंत्रणा सुधारण्यास होईल मदत
या संशोधनामुळे सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन यंत्रणा सुधारण्यासाठी उपयोग होईल. आपली जीपीएस यंत्रणा, विमानांचे रडार आणि मोबाईल नेटवर्क ज्या उपग्रहांच्या सिग्नलवर चालतात, ते सिग्नल पृथ्वीवर येताना याच आयनोस्फिअरमधून प्रवास करतात. जर विजांच्या कडकडाटाने या थरात अडथळे निर्माण झाले, तर जीपीएस लोकेशनमध्ये चूक होऊ शकते किंवा कम्युनिकेशनमध्ये व्यत्यय येऊ शकतो.