गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रात शुक्रवारी सकाळी बुडणार्या तीन महिला पर्यटकांना वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. या तिघीही जोतिबा डोंगरच्या (ता. पन्हाळा) रहिवाशी आहेत.
निशा अजय सांगळे (वय 30), हर्षदा प्रमोद मिटके (30), तनुजा रमेश आभाळे (17) या तिघी कुटुंबीयांसह शुक्रवारी सकाळी गणपतीपुळे येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी समुद्रस्नान करायचे ठरवले. कुटुंबीयांसह समुद्रस्नानाचा आनंद घेत असताना अंदाज न आल्यामुळे त्या लाटांमध्ये अडकल्या. त्यांना बाहेर पडता आले नाही. घाबरलेल्या तिघींनीही बुडू लागल्यावर आरडाओरडा केला असता वॉटर स्पोर्ट व्यावसायिक आणि जीवरक्षकांनी स्पीड बोटीच्या सहाय्याने तत्काळ त्यांच्या दिशेने धाव घेत त्यांना सुखरूप पाण्याबाहेर काढले.