कोवाड : आजीच्या अंत्यविधीसाठी आलेल्या तीन शाळकरी मुलींचा हुंदळेवाडी (ता. चंदगड) येथे शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. धनुष्का पुंडलिक सांबरेकर (वय 15), रिया चंद्रकांत सांबरेकर (12, दोघीही मूळ गाव आंबेवाडी, ता. बेळगाव, सध्या रा. पर्वरी, गोवा) व स्वरा जयवंत नाईक (13, मूळ गाव होसूर, ता. चंदगड, सध्या रा. उचगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. 25) दुपारी 4 वाजता घडली.
रिया व धनुष्का हिच्या वडिलांच्या आई व स्वरा हिच्या आईच्या आई सुशीला सांबरेकर (70, मूळ गाव आंबेवाडी, माहेर हुंदळेवाडी) यांचे आठ दिवसांपूर्वी निधन झाले आहे. सुशीला यांचे विधिकार्य करण्यासाठी या तिन्ही मुली आई-वडिलांसमवेत हुंदळेवाडी येथे आल्या होत्या. तिघींच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.