हुपरी : येथील कागल वेस गैबी चौक परिसरातील तीन घरे आगीत भस्मसात झाली. 
कोल्हापूर

House Fire in Hupari | हुपरीमध्ये आगीत तीन घरे भस्मसात

सुरुवातीला शॉर्टसर्किट त्यानंतर सिलिंडरचाही स्फोट

पुढारी वृत्तसेवा

हुपरी : येथील कागलवेस गैबी चौक परिसरातील चांदी व्यावसायिक अमित दिलीप नरके यांच्या घराला सुरुवातीला शॉर्ट सर्किटने आग लागली. त्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमुळे लगतची अन्य दोन घरेही भस्मसात झाली. सुदैवाने नरके यांच्या घरातील भाडेकरू बाहेरगावी गेल्याने व अन्य दोन्हीही घरांत कुणीही वास्तव्यास नसल्याने जीवितहानी टळली. जवाहर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाने व स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, या घटनेत सुमारे दहा लाखांहून अधिक रक्कमेच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

चांदी व्यावसायिक अमित नरके यांनी गैबी चौक परिसरातच दुसरे घर बांधल्याने ते कुटुंबासह नवीन घरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे हे जुने घर त्यांनी एका पेंटरला भाड्याने दिले आहे. हा भाडेकरू गेल्या काही दिवसांपासून कुटुंबासह बाहेरगावी गेला असल्याने सध्या या घरात वास्तव्यास कुणीही नाही. जुने लाकडी रूफकाम असलेल्या या घराला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला शॉर्टसर्किटने आग लागली. स्थानिक रहिवाशी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच काही वेळाने या घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

त्यामुळे आगीने बघता बघता उग्र रूप धारण करीत नजीकच्या रिकाम्या अन्य दोन घरांनाही आपल्या कवेत घेतले. आगीचा रुद्रावतार पाहून परिसरातील सर्वांची भीतीने पाचावर धारण बसली होती. काहींनी जवाहर साखर कारखान्याच्या अग्निशमन दलाला ही माहिती कळवली. काही वेळातच अग्निशमनची गाडी आली; पण घटनास्थळी जाण्यासाठी मोठा रस्ताच उपलब्ध नसल्याने काही अंतरावरूनच आगीवर पाण्याचा मारा केला. आगीवर नियंत्रण ठेवत अथक परिश्रम घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT