Raju Shetty's Warning | ऊस दराचा तिढा न सुटल्यास उद्या कोल्हापूरसह ३ जिल्हे बंद! 
कोल्हापूर

Raju Shetty's Warning | ऊस दराचा तिढा न सुटल्यास उद्या कोल्हापूरसह ३ जिल्हे बंद!

राजू शेट्टी यांचा इशारा; चक्का जाम आंदोलन सुरूच

पुढारी वृत्तसेवा

पेठवडगाव : ऊस दराचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावण्यासाठी आम्ही दोन पावले मागे येण्यास तयार आहोत. कारखानदारांनी उसाला पहिली उचल प्रतिटन एकरकमी ४,२०० रुपये द्यावी; अन्यथा शुक्रवारी (दि. ६) कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांत कडकडीत बंद पाळण्यात येईल. तसेच, साखर कारखानदारांच्या घरांसमोर शिमगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बुधवारी किणी टोल नाक्यावरील आंदोलनस्थळी दिला.

किणी टोल नाक्यावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी सभा झाली. यावेळी शेट्टी यांनी ऊस दराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण दोन पावले मागे येऊ, कारखानदारांनी दोन पावले पुढे यावे आणि सामंजस्याने तोडगा काढत एकरकमी पहिली उचल ४,२०० रुपये द्यावी, अशी मागणी केली. यासाठी कारखानदारांना दोन दिवसांची मुदत दिली. यानंतर कारखानदारांच्या दारात शिमगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला. शेतकरी दोन दिवसांपासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना प्रशासनाकडून प्रश्न सोडविण्यासाठी ठोस प्रयत्न होत नसल्याबद्दल विविध वक्त्यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये; अन्यथा आंदोलनाची व्याप्ती वाढवून अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला. दरम्‍यान, मंगळवारपासून सुरू असलेल्‍या या आंदोलनाचा फटका वाहतुकीला बसला असून, विशेषत: सणासुदीच्‍या काळात प्रवास करणाऱ्यांना लांबचा फेरा मारून पोहोचावे लागत होेते. यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसला आणि वेळेचा अपव्‍यय झाला.

मंत्री मुश्रीफ मध्‍यस्‍थी करणार

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री म्हणाले की, हा प्रश्न साखर कारखाने आणि शेतकरी यांच्यातील आहे. मात्र, राज्य सरकार चर्चा करत आहे. राज्य सरकारची भूमिका मध्यस्थाची आहे, याबाबत मार्ग निघावा आणि आंदोलन शांततेत संपावे, यासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांना चर्चा करण्यास सांगितले आहे, असे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पर्यायी मार्गाने वाहतूक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या किणी टोल नाका आणि नागठाणे येथे सुरू असलेल्‍या चक्‍का जाम आंदोलनामुळे बाधित झालेली पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (NH 48) वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

मुंबईकडून कोल्हापूरकडे : सातारा - बॉम्बे रेस्टॉरंट - रहिमतपूर - पुसेसावळी - सांगली - अंकली - सांगली फाटामार्गे NH 48 चा वापर करतील.

कोल्हापूरकडून मुंबईकडे : NH 48 - सांगली फाटा - अंकली - सांगली - पुसेसावळी - रहिमतपूर - बॉम्बे रेस्टॉरंट - सातारा या मार्गाने जातील.

आंदोलन सुरू असेपर्यंत आणि महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे पूर्ववत होईपर्यंत प्रवाशांनी अनावश्यक गर्दी व वाहतूक कोंडी टाळावी आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महामार्ग वाहतूक दलाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT