Dudhganga river | ‘दूधगंगा’वर 3 दिवसांची उपसा बंदी 
कोल्हापूर

Dudhganga river | ‘दूधगंगा’वर 3 दिवसांची उपसा बंदी

वेदगंगेनंतर दूधगंगेवरही अंमलबजावणी; शेतकर्‍यांसमोर पाणी व्यवस्थापनाचे आव्हान

पुढारी वृत्तसेवा

बा. ल. वंदूरकर

कागल : प्रचंड उन्हामुळे जलसाठ्यांमध्ये झपाट्याने घट होत असल्याने कागल तालुक्यातील पाणी परिस्थिती गंभीर होऊ नये, यासाठी चिकोत्रा आणि वेदगंगा नदीनंतर आता दूधगंगा नदीवरही उपसा बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा लागणार आहे. प्रशासनाने या निर्णयाची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचा इशारा दिला आहे.

कागल तालुक्यात चिकोत्रा, वेदगंगा आणि दूधगंगा या प्रमुख नद्या असून, चिकोत्रा नदीवर बारमाही उपसा बंदी कायम असते. गेल्या आठवड्यात वेदगंगा नदीवर दोन दिवसांची उपसा बंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता बारमाही वाहणार्‍या दूधगंगा नदीवर 11 ते 13 मे या कालावधीत तीन दिवसांची उपसा बंदी जाहीर करण्यात आली आहे. दूधगंगा धरणापासून सुळकूड येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यापर्यंत नदीच्या दोन्ही तीरांवरील तसेच ओढे-नाल्यांवरील शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या सर्व उपसा यंत्रांवर ही बंदी लागू राहणार आहे. उपसा बंदीच्या काळात अनधिकृतपणे पाणी उपसा करताना आढळल्यास संबंधित यंत्र जप्त करण्यात येणार असून, परवानाधारकांचा उपसा परवाना एक वर्षासाठी रद्द करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. अल निनोच्या प्रभावामुळे उन्हाची तीव्रता वाढली असून, जलाशयांतील पाणी बाष्पीभवनामुळे वेगाने कमी होत आहे. नदी, ओढे, नाले, तलाव आणि विहिरींची पाणीपातळी घटत चालली आहे. परिणामी, संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.

माळरानावरील पिके संकटात

दुपारच्या तीव्र उन्हामुळे पाण्याखालील पिकेसुद्धा कोमेजू लागली आहेत. विशेषतः, माळरानावरील पिकांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, वेळेवर पाण्याचा फेरा न मिळाल्यास पिके करपण्याचा धोका निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT