कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पाडळी (ता. करवीर) येथील जिल्हा परिषद कॉलनीतील अक्षय जिरंगे यांच्या बंद बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे 12 लाख रुपये किमतीचे 30 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्याचबरोबर बालिंगा येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाखांचा ऐवज लंपास केला. या तीन घरफोड्यांतून 15 लाख रुपयांचे दागिने व रोकड लंपास करण्यात आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहर आणि उपनगरांतील चोरी, घरफोडीचे हे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरूच आहे. त्यामुळे या चोर्या रोखणे हे पोलिसांसमोर एक आव्हान आहे.
सुट्टीमुळे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेल्यांच्या बंगल्यांना चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. पाडळी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीत अक्षय जिरंगे हे कुटुंबीयांसह राहतात. 30 तारखेला ते कुटुंबीयांसह कोकणात पर्यटनासाठी गेले होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांचा बंगला फोडला. दुमजली बंगल्याच्या तळमजल्यावरील किचनमध्ये घुसून चोरट्यांनी साहित्य विस्कटले. त्यानंतर त्यांनी पहिल्या मजल्यावरील दोन्ही बेडरूममध्ये साहित्य विस्कटले. बेडरूममधील तिजोर्या फोडून त्यांनी 10 तोळ्यांच्या बिलवर व पाटल्या, अडीच तोळ्यांचा राणीहार, 3 तोळ्यांचा लक्ष्मीहार आणि सोन्याचा सर, 2 तोळे वजनाचा रवी माठाचा हार आणि चेन, 8 अंगठ्या, बाल अंगठ्या, दीड तोळ्याचे झुबे, 7 जोड सोन्याचे टॉप्स असे
11 लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरीचा हा प्रकार शेजार्यांच्या लक्षात येताच त्यांनी जिरंगे यांना फोन करून याची माहिती दिली. जिरंगे हे गावाहून परत आले. त्यांनी करवीर पोलिसांत तक्रार दिली आहे. दरम्यान, याच मध्यरात्री चोरट्यांनी बालिंगा गावानजीकच्या बंडोपंत दळवी कॉलनीतील काही बंगल्यांना लक्ष केले. एलआयसी एजंट सोपान गायकवाड हे 30 तारखेला ते कुटुंबीयांसह गावी गेले होते. दुसर्या दिवशी सकाळी शेजार्यांनी फोन करून त्यांना घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यांनी येऊन पाहिले असता बंगल्यातील तिजोरी फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी करवीर पोलिसांत दिली आहे. त्यांच्याच बाजूला राहणारे निखिल सुतार हे अग्निशमन दलात फायरमन म्हणून काम करतात. त्यांचे उमा टॉकिजजवळ जुने घर आहे. दोन दिवसांपूर्वी ते कुटुंबीयांसमवेत जुन्या घरी राहायला गेले होते. यादरम्यानच्या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याचा कडी-कोयंडा उचकटून बंगल्यातील लाकडी कपाट फोडले. चोरट्यांच्या हाती दागदागिने लागले नाहीत; पण रोख 10 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले.
तिजोरीतील साहित्य अस्ताव्यस्त
जिरंगे यांच्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर असणार्या दोन्ही बेडरूममध्ये असणारे कपाट, लोखंडी तिजोरी चोरट्यांनी कटावणीच्या साहित्याने फोडली. या तिजोरीतील दागिने लंपास केले. तिजोरी फोडल्यानंतर तिजोरीतील कपडे व इतर साहित्य चोरट्यांनी खोलीमध्ये विस्कटून टाकले होते.
सीसीटीव्हीची तपासणी
जिल्हा परिषद कॉलनीतील चोरी मोठी आहे. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार उघड होताच परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांचे फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अशाप्रकारच्या चोर्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांनी आता गस्तदेखील वाढविली आहे. परंतु, काही केल्या हे प्रकार थांबायला तयार नाहीत.