विशाळगड येथील मारुती टेकडी मंदिराजवळील दरीत म्हशींचा शोध घेताना गडवासिय  Pudhari Photo
कोल्हापूर

विशाळगडावर पाण्याच्या शोधात ३ म्हैशी हजारो फूट दरीत कोसळल्या, २ ठार

Vishalgad News | मारुती टेकडी जवळील घटना ; गुरव कुटुंबाचे २ लाखांचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक विशाळगडावर सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे गडावरील विहिरी आणि नैसर्गिक झरे पूर्णपणे आटले आहेत. याचा फटका केवळ गडावरील रहिवाशांनाच नव्हे, तर मुक्या जनावरांनाही बसत आहे. पाण्याच्या शोधात भटकताना, येथील प्रकाश गुरव यांच्या तीन म्हैशी मारुती टेकडी जवळील हजारो फूट दरीत पडल्या. या दुर्दैवी घटनेत दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे गुरव यांचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज (दि.१८) सकाळी दहाच्या सुमारास घडली. (Vishalgad News)

अतिक्रमणाने उद्ध्वस्त, आता निसर्गाचा घाव!

विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत गुरव यांचे घर आणि उपजीविकेचे साधन असलेला चहाचा गाडा प्रशासनाने उद्ध्वस्त केला. त्यातच रेशनचे धान्यही बंद झाल्याने ते हलाखीचे जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत, आपल्या तीन म्हैशींच्या दुधाच्या उत्पन्नावर ते कुटुंबाचा गाडा चालवत होते. मात्र, आता या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. डोक्यावर छत नाही आणि आता उत्पन्नाचे साधनही हिरावले गेल्याने गुरव आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे निराधार झाले आहे.

पाण्यासाठी तडफड, जनावरांची जीवघेणी भटकंती!

विशाळगडावर पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. यामुळे माणसांना तर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेच, पण मुक्या जनावरांची अवस्थाही बिकट झाली आहे. पाण्याच्या शोधात निघालेल्या प्रकाश गुरव यांच्या म्हैशींना दरीत पडून आपले प्राण गमवावे लागले. याकडे प्रशासन लक्ष देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष आणि दानशूरांची गरज

विशाळगडावरील पाणीटंचाई आणि अतिक्रमणाचा प्रश्न राज्यभर गाजत असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. प्रशासनाच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत. आणि आता जनावरांनाही पाण्यासाठी आपले प्राण गमवावे लागत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रकाश गुरव यांच्यावर कोसळलेल्या या दुःखाच्या डोंगरावर मात करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी तातडीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करून पुन्हा उभे करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, जखमी म्हैशीला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी गडवासियांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून, खोल दरी आणि बिकट भूभाग यामुळे अनेक अडचणी येत आहेत. या परिस्थितीत माणुसकीच्या नात्याने सर्वांनी एकत्र येऊन गुरव कुटुंबीयांना आधार देणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT