कोल्हापूर : गुंतवणुकीवर तीन ते पाच टक्के परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची तीन कोटींची फसवणूक करून पसार झालेल्या पती, पत्नीसह तिघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली. समीर सुभाष नार्वेकर (वय ३६), नेहा समीर नार्वेकर (वय ३६, दोघे रा. गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि अमित विश्वनाथ बालम (वय ३८, रा. कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी त्यांची नावे आहेत. मे २०२६ मध्ये टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्युशनच्या सहा संचालकांविरोधात गुन्हा दाखल होता.
कोल्हापुरात कावळा नाका येथील रायसन्स गॅलेरिया इमारतीत संशयित समीर नार्वेकरने टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्युशन या कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. कंपनीत ९ लाखांच्या गुंतवणुकीवर ३ टक्के, १० लाखांच्या गुंतवणुकीवर ४ टक्के, २५ लाखांच्या गुंतवणुकीवर ५ टक्के व्याजाचा परतावा मिळेल, अशी जाहिरात केली होती. तसेच एक वर्षात सर्व रक्कम परत करण्याचेही आश्वासनही दिले होते. कंपनीत जवळपास २ कोटी ५३ लाखांची गुंतवणूक केली होती.
यातून १ कोटी ३८ लाख ७२ हजारांचा परतावा देणे लागत होते. अशी एकूण ३ कोटी ९३ लाखांची फसवणूक करून संचालक पसार झाले. याप्रकरणी समीर नार्वेकरसह त्याची पत्नी नेहा, चिन्मय पालकर, विजय पताडे (रा. राधानगरी), निखील सुर्वे, अमित बालमसह अन्य संचालकांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ठाणे येथील कारागृहातून मंगळवारी तिघांचा ताबा शाहूपुरी पोलिसांनी घेतला होता. बुधवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता मंगळवारी (दि. ८) पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अभिजित पवार तपास करत आहेत.