चंदगड : चार दिवसांपूर्वी गोवा बनावटीच्या दारूच्या शंभर बाटल्या, तलवार व कार असा 12 लाखांचा मुद्देमाल जप्त प्रकरणात चंदगड पोलिसांनी अटक केलेल्या तीन संशयित आरोपींना चंदगड वनपरिक्षेत्राच्या अधिकार्यांनी साळिंदर या वन्यप्राण्याच्या शिकार प्रकरणी शुक्रवारी (दि. 5) अटक केली.
संशयित जोतिबा वैजू चव्हाण (वय 29), संतोष मारुती चव्हाण (वय 28), महांतेश मल्लाप्पा देसाई (वय 26, सर्व रा. मुरकुटेवाडी, ता. चंदगड) हे तिघेजण कारमधून गोवा बनावटीच्या दारूच्या 100 बाटल्या, तलवार घेऊन हेरे या रस्त्यावरून पाटणे फाट्याकडे जात असताना चंदगड पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्यांची कार जप्त केली. तपास सुरू असतानाच कारमधून मृत प्राण्याचा वास येऊ लागला. चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वास पाटील यांनी चंदगड वनपरिक्षेत्र मंडळाचे वनक्षेत्रपाल तुषार गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. यानंतर वनपाल के. एस. डेळेकर, वनरक्षक एस. जी. कोळी, एम. आय. सनदी, कॉन्स्टेबल अजय वाडेकर यांनी कारची पुन्हा तपासणी केली.
यामध्ये स्टेपनीमध्ये मृत साळिंदर लपवून ठेवला होता. चंदगड न्यायालयाने त्यांना सोमवारपर्यंत (दि. 8) वनकोठडी सुनावली आहे. याबाबतचा तपास कोल्हापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहायक वनसंरक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदगड परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल टी. आर. गायकवाड, वनपाल कृष्णा डेळेकर, वनरक्षक सागर कोळी, मौलामुबारक सनदी, सादिया तांबोळी, कृष्णा शेरे, राहुल जराड, राजू धनवई करत आहेत.