कोल्हापूर : न्यायप्रविष्ट मालमत्तेत प्रवेश केल्यानंतर दररोज होणाऱ्या शिवीगाळीला कंटाळून जिलेटिन कांड्यांच्या सहाय्याने स्फोट घडवून संपूर्ण घरच जमीनदोस्त केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तिघांना आठ तासांत अटक केली. प्रज्योत दीपक पवार (२४, रा. बापूरामनगर, कळंबा), अभिजित प्रभाकर चौगले (२४), प्रसाद दीपक चौगले (२३, दोघेही रा. परिते, ता. करवीर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सुर्वेनगर रणनवरे कॉलनी येथील प्लॉट नं. ६७ या मिळकतीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. प्रज्योत पवार व मनीष पेठे यांच्यामध्ये या मिळकतीवरून न्यायालयीन वाद सुरू आहे. या मिळकतीमध्ये प्रज्योत पवार गेल्यानंतर त्याला मनीष पेठे शिवीगाळ करत होता. तू चोरटा आहेस, आईला फसवून जागा नावावर केली आहेस, अशा भाषेत टोमणे मारत होता. यामुळेच संतापलेल्या प्रज्योतने असलेले घर पाडण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दुपारी घरामध्ये ड्रील करून सायंकाळी ७ च्या सुमारास जिलेटिनच्या सहाय्याने स्फोट घडवून आणले.
कोल्हापूर : न्यायप्रविष्ट मिळकतीमध्ये प्रवेश केल्यानंतर वारंवार होणाऱ्या शिवीगाळीला कंटाळून एकदाच हे घर जिलेटिन स्फोटाने उद्ध्वस्त करायचे. त्याच्या भोवती संरक्षक भिंत घालून कायमचा ताबा घ्यायचा या इराद्यानेच ब्लास्टिंगमध्ये सराईत असणाऱ्या दोघांना ३० हजारांची सुपारी देऊन सुर्वेनगर येथील स्फोट घडवल्याची कबुली प्रज्वल, अभिजित, प्रसाद यांनी पोलिसांसमोर दिली.
दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास प्रज्योत, अभिजित व प्रसाद हे तिघे मिळकतीमध्ये गेले. त्यांनी हॅंड ड्रीलच्या सहाय्याने घराच्या सर्व भिंतीमध्ये सुमारे ३६ हून अधिक होल पाडले. यामध्ये सुमारे ६ कांड्यांचे १८ तुकडे करून ते एक आड एक अशा होलांमध्ये भरले. यानंतर वातीच्या सहाय्याने जिलेटिनचे सर्व तुकडे जोडून घेतले.
अभिजीत हा ब्लास्टिंमधील तज्ज्ञ आहे. गेल्या १० वर्षांपासून तो ब्लास्टिंगचा व्यवसाय करत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्याने हे काम बंद केले होते. ब्लास्टनंतर तेथून सटकण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी अभिजितने २ फुटांची वात सुरुवातीच्या कांडीला लावली होती. २ मिनिटे आणि ६ सेकंदांमध्ये स्फोट होईल, असे नियोजन केले होते. सहा स्फोट करण्यात तिघे यशस्वी झाले.
बिद्रीतून आणल्या जिलेटिन
अभिजितने ८ महिन्यांपासून ब्लास्टिंगचे काम बंद केले आहे. तो बिद्री येथील दत्ता नामक एक व्यक्तीकडून जिलेटिन खरेदी करत होता. यापैकी काही कांड्या अभिजितकडे शिल्लक होत्या. त्याचाच वापर या स्फोटामध्ये केला. दत्ताकडेही पोलिसांनी चौकशी केली असून, तो परवानाधारक जिलेटिन कांड्या विक्रेता असल्याची माहिती समोर आली.
पोलिसाच्या मुलाची मध्यस्थी
प्रज्योतने घर स्फोटाच्या सहाय्याने उडवायचा निर्णय मित्र संकेत मगदूमला सांगितला. यानंतर दिंडनेर्ली येथील संकेतने प्रज्योतची अभिजितसोबत ओळख करून दिली. संकेतचे वडील पोलिस दलामध्ये असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्याचीही चौकशी करण्यात येणार आहे.