कोल्हापूर : रामानंदनगर येथील डॉ. व्ही. व्ही. देशपांडे यांचे हॉस्पिटल आणि संतोष अकोळकर यांच्या बंगल्यावर दगडफेक करून चारचाकी, दुचाकींची तोडफोड करून दहशत माजविणार्या तीन संशयितांना करवीर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येत आहे.
टोळीचा म्होरक्या वृषभ ऊर्फ मगर विजय साळोखे (वय 24, रा. रामानंदनगर, कोल्हापूर), ओंकार ऊर्फ छबी बजरंग जाधव (22, रा. तिरंगा चौक, गंजीमाळ, कोल्हापूर) व सौरभ ऊर्फ पिल्या अशोक कांबळे (रा. पोवार कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) अशी संशयितांची नावे आहेत. अन्य दोन फरार संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.
संशयित वृक्षभ साळोखेसह त्याच्या साथीदारांनी परवा मध्यरात्री डॉ. देशपांडे यांच्या हॉस्पिटल व अकोळकर यांच्या घरावर दगडफेक करून चार मोटारींसह एका दुचाकीची तोडफोड केली. हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीमध्ये डॉ. देशपांडे, अकोळकरही जखमी झाले होते. रामानंदनगर परिसरात संशयितानी दगडफेक व तोडफोड करून दहशत माजविल्याने परिसरात संतापाचे वातावरण होते. संशयिताना पोलिसांनी ताबडतोब अटक करावी, या मागणीने जोर धरला होता. सायंकाळी म्होरक्यासह तिघांना जेरबंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले.