इचलकरंजी : नशेसाठी वापरले जाणारे मेफेंटरमाईन इंजेक्शनची विक्री करणार्या संग्राम अशोकराव पाटील (वय 29, रा. श्रीपादनगर), सचिन सुनील मांडवकर (25 रा. यशवंत कॉलनी) व अभिषेक गोविंद भिसे (25 रा. लालनगर) या तिघांना गावभाग पोलिसांनी अटक केली.
त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणार्या मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 52 बाटल्या, 60 हजार रुपये रोख, 3 मोबाईल व 2 दुचाकी असा 2 लाख 36 हजार 964 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याची माहिती पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली.
पोलिसांनी संग्राम पाटील याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्या घराची तपासणी केली असता मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 18 बाटल्या मिळून आल्या. त्याच्या घरातून सचिन मांडवकर बाहेर पडताना आढळला. त्याच्याकडेही इंजेक्शनच्या 5 बाटल्या आढळल्या. लालनगर येथील अभिषेक भिसे याच्याकडून इंजेक्शनच्या 7 बाटल्या जप्त केल्या. त्याच्या घरातून आणखी 22 बाटल्या तसेच रोख रक्कम 60 हजार जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक महेश चव्हाण, सहा. पोलिस निरीक्षक पूनम माने, अनिल पाटील यांच्या पथकाने केली. तिघांनाही न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.