कोल्हापूर : लक्षतीर्थ वसाहत येथे वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापून धांगडधिंगा करणार्या तरुणांना हटकताना चक्क वर्दीतील पोलिसावरच हल्ला चढविणार्या तिघांना अटक करण्यात आली. सादिक मोहम्मद पाटणकर (वय 20), अवधूत पिराजी गजगेश्वर (19) व आदित्य राहुल भोजणे (22, तिघेही रा. लक्षतीर्थ वसाहत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस हेड कॉन्स्टेबल पंढरीनाथ सामंत यांनी त्यांच्याविरुद्ध लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सामंत हे 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री लक्षतीर्थ वसाहत येथील शाहू चौकात पोलिस कॉन्स्टेबल कोळी यांच्यासोबत शासकीय मोटारसायकलवरून गस्त घालत होते. त्यावेळी पाटणकर, गजगेश्वर, भोजणे हे रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करत होते. तसेच, मोठमोठ्याने आरडाओरडा करत होते. पोलिसांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिघांनी सामंत यांची कॉलर पकडली. शिवीगाळ करून मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड, हेड कॉन्स्टेबल शशिकांत डोंगरे यांनी तपास करून आरोपींना अटक केली.