कोल्हापूर : अधिकाऱ्यांनी कोल्हापूरचे वाटोळे केले आहे. गेले पाच वर्षे प्रशासक राजवट असल्याने तुमचे चालले. पण आता खपवून घेणार नाही. फक्त आयुक्त कामात गतिमान असून चालत नाही, तर अधिकारीही कृतिशील पाहिजेत. प्रशासनाची गती मंदावली आहे. आता कामात सुधारणा करून गती वाढविली नाही, तर पायात फटाके वाजवायला लागतील, असे म्हणत सत्ताधारी महायुती आणि विरोधकांनी प्रशासनाला निशाण्यावर घेतले. मूलभूत नागरी सुविधांसाठी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची झोड उठवत प्रसंगी अधिकाऱ्यांना कोल्हापुरी पाहुणचार देऊ, असा इशाराही दिला.
तरीही शहराचे प्रश्न का सुटले नाहीत?
महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. आयुक्त के. मंजुलक्ष्मी प्रमुख उपस्थित होत्या. गुंठेवारी, कचरा, पाण्यासह विविध प्रश्नांवर शुक्रवारी (दि. 20) झालेल्या पहिल्याच सभेत सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. तब्बल साडेसहा तास सभा चालली. पाच वर्षे प्रशासकीय राजवट होती. मग शहराचे प्रश्न का सुटले नाहीत, असा जाब नगरसेवकांनी विचारला.
प्रश्नांची सरबत्ती...
पाचशे कोटींची थेट पाईपलाईन योजना राबवूनही शहर तहानलेले आहे. पाण्याची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. गुंठेवारी नियमितीकरणासाठी अधिकारी अकार्यक्षम बनले आहेत. कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, भटक्या कुत्र्यांमुळे शहर भयभीत झाले आहे, 145 कोटी खर्चूनही ड्रेनेजच्या सुविधा नाहीत आदींसह विविध प्रश्नांची अधिकाऱ्यांवर सरबत्ती करण्यात आली. सभागृह नेता मुरलीधर जाधव, विरोधी पक्षनेता राजेश लाटकर, शिवसेना गटनेता शारंगधर देशमुख, काँग््रेास गटनेता इंद्रजित बोंद्रे, राष्ट्रवादी गटनेता आदिल फरास, जयश्री चव्हाण आदींसह इतर नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला.
घरफाळा, पाणीपट्टी वाढ करू देणार नाही
आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांनी कोल्हापूर शहरात 2011 साली असणारा घरफाळा अद्याप आहे, 15 वर्षांत घरफाळा वाढ झालेली नाही. पाणीपट्टीही वाढविलेली नाही, त्यामुळे सभागृहाने घरफाळा आणि पाणीपट्टी वाढवून द्यावी, अशी मागणी केली. परंतु महापौर निकम यांनी कोणत्याही परिस्थितीत कर वाढ करू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.