[author title="प्रवीण मस्के" image="http://"][/author]
कोल्हापूर : अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने बीबीए, बीसीए, बीसीएस, बीएमएस, बीबीएम अभ्यासक्रमांसाठी यावर्षी प्रथमच सीईटी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. परंतु याची पुरेशी माहिती नसल्याने बारावीच्या हजारो विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नसल्याचे स्पष्ट झाले असून त्यामुळे शिक्षण संस्थाही अडचणीत येणार आहेत.
पुरेसे प्रवेशच होणार नसल्याने राज्यभरातील महाविद्यालयात बीबीए, बीसीएच्या जागा रिक्त राहणार असून तुकड्या बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभ्यासक्रमापासून वंचित राहावे लागणार असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.
बीबीए, बीसीए अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना देश-विदेशात नोकरी व उच्च शिक्षणाच्या संधी मिळतात. बीबीए, बीसीए हे व्यावसायिक अभ्यासक्रम यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) अखत्यारित होते. यावर्षी पहिल्यांदाच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने एमबीए, एमसीए या व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या धर्तीवर बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम हे पदवी शिक्षणक्रमही अखत्यारीत घेतले आहेत. त्यामुळे त्यांना व्यावसायिक शिक्षणक्रमांचा दर्जा प्राप्त झाला आहे. एआयसीटीईच्या नियमानुसार यावर्षी पहिल्यांदाच बीबीए, बीसीएसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. परंतु अपेक्षित अर्ज न आल्यामुळे तीनवेळा मुदत वाढविली.
प्रवेश परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता यावर्षी सुमारे 60 टक्क्यांहून अधिक प्रवेश जागा रिकाम्या राहण्याची शक्यता आहे. दरवर्षी या अभ्यासक्रमाला सीईटीशिवाय प्रवेश होत होते. यावर्षी पहिल्यांदाच झालेल्या प्रवेश परीक्षेची विद्यार्थ्यांमध्ये पुरेशी जागृती न झाल्यामुळे अत्यल्प प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा पुन्हा एकदा घ्यावी. यावर्षासाठी प्रवेश परिक्षेशिवाय प्रवेश देण्याची परवानगी राज्य शासनाने द्यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालकांमधून होऊ लागली आहे.
थेट प्रवेश देता येणार नाहीत
चालू शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण अंमलात येत आहे. यानुसार सर्व अभ्यासक्रम तंत्रशिक्षण परिषदेने आपल्या अखत्यारीत घेतले आहेत. पूर्वी बीबीए, बीसीए अभ्यासक्रम विद्यापीठ स्तरावर चालायचे. यासाठी आता सीईटी परीक्षा ठेवली आहे. 17 जूननंतर सीईटीचा निकाल लागणार आहे. आतापर्यंत बारावीतील गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला जात होता. परंतु यावर्षी सीईटीतील गुणांवर प्रवेश देण्यात येणार आहे.
बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. यावर्षी पहिल्यांदाच घेतलेल्या सीईटी परीक्षेबाबत जनजागृती झाली नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी शिक्षणास मुकणार आहेत.
– प्रा. डॉ. प्रवीण जाधव
सचिव, शिवाजी विद्यापीठ मॅनेजमेंट टीचर्स असोसिएशन