कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाशेजारी थांबलेल्या शांतादेवी पाटील यांना धीर देताना मुली व सुना.  (छाया : मिलन मकानदार)
कोल्हापूर

Dr. D.Y. Patil | अश्रूंच्या धारा... आठवणींचा हुंदका... अन् ते ३० तास

पाटील कुटुंबाशी जोडलेल्या प्रत्येकाचा दाटला कंठ; पार्थिव अनंताच्या प्रवासाला नेताच ‘यशवंत निवास’ला आले रितेपण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : मंगळवारी सकाळी अकरा वाजून गेल्यानंतर डॉ. डी. वाय. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आणि बुधवारी सायंकाळी सहा वाजता ते अनंतात विलीन झाले. या दोन क्षणांमध्ये जणू काही कित्येक युगे सरत आहेत असं वाटत होतं. ते ३० तास पाटील कुटुंबीयांसाठीच नव्हे तर डी. वाय. दादांवर प्रेम करणाऱ्या, त्यांच्याविषयीच्या आदराने भारावलेल्या शेकडो लोकांसाठी अश्रूंच्या धारा आणि आठवणींच्या हुंदक्याने भरलेला तो काळ होता. दादांचे पार्थिव अनंतात विलीन करण्यासाठी खांद्यावर घेताच यशवंत निवासला अक्षरश: रितेपण आले.

मंगळवारपासून बुधवारच्या दुपारपर्यंत यशवंत निवासात प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवत होती ती एक विलक्षण शांतता. घरात शेकडो लोकांची वर्दळ होती, तरीही आवाज आपोआप मंदावला होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दु:ख, डोळ्यांत अश्रू आणि मनात एकच प्रश्न होता "दादा आता खरंच आपल्यात नाहीत?" घरातील कानाकोपरा दादांच्या सहवासातील असंख्य आठवणी जपून ठेवत असल्याचा भास होत होता.

पार्थिवाजवळ बसलेल्या पत्नी शांतादेवी यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. मुली नंदिता, भाग्यश्री आणि राजश्री आईला धीर देत होत्या; पण दादांची आठवण होताच त्या स्वतःच आईच्या गळ्यात पडून हुंदके देत होत्या. मुलगा संजय आणि सतेज, सून वैजयंती, प्रतिमा, नातवंडे, परतवंडे, जावई अंत्यदर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला संयमाने भेटत होते, मात्र एखाद्याने दादांची आठवण सांगितली की त्यांच्या डोळ्यांतही अश्रू दाटून येत होते. कुणी त्यांच्या समाजकारणाच्या आठवणी सांगत होते, कुणी शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा उल्लेख करत होते, तर कुणी आयुष्यातील कठीण प्रसंगी त्यांनी दिलेल्या आधाराची कथा सांगत होते. प्रत्येक आठवणीसोबत वातावरण अधिकच गहिवरत होते. अश्रू पुसणारे, पाठीवर फिरणारे हात होते; पण सांत्वनाचे शब्द मात्र कुणालाच सापडत नव्हते.

‘दादा’ गेले... पण प्रत्येकाच्या डोळ्यांत एक आठवण ठेवून

कुणासाठी ते वडिलांसारखा आधार होते, कुणासाठी मार्गदर्शक, तर कुणासाठी आयुष्य घडवणारे गुरू. यशवंत निवासात येणारा प्रत्येकजण डॉ. डी. वाय. पाटील यांच्याशी जोडलेली एखादी आठवण मनात घेऊनच आला होता. पार्थिवासमोर नतमस्तक होताना अनेकांच्या ओठांवर शब्द नव्हते; फक्त डोळ्यांतून वाहणारे अश्रूच त्यांच्या ऋणानुबंधांची साक्ष देत होते. घरातील मदतनीस, शेतातील कामगार, परिचारिका, डॉक्टर, कर्मचारी, विद्यार्थी, सहकारी आणि जिवाभावाचे मित्र... प्रत्येकालाच वाटत होते, "आज आमच्या घरातीलच एक माणूस निघून गेला." म्हणूनच बुधवारी यशवंत निवासातून दिलेला अखेरचा निरोप एका व्यक्तीला नव्हे, तर लाखो हृदयांवर अधिराज्य गाजवणाऱ्या एका माणुसकीच्या आधारवडाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT