कोल्हापूर : खरेदीच्या बहाण्याने बेकरीसह किराणा दुकानातील महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून आलिशान मोटारीतून पलायन करणार्या दोन सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी जेरबंद केले. इम्रान शमशुद्दीन मोमीन (वय 38, रा. बेघर वसाहत, हेर्ले, ता. हातकणंगले), सुदाम हणमंत कुंभार (40, आंदळी, ता. पलूस जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. संशयितांकडून 22 ग्रॅम दागिने, आलिशान मोटार, दोन दुचाकी असा 9 लाख 16 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत चोरट्यांनी शाहूपुरी, गोकुळ शिरगाव आणि शिरोळ येथील गुन्ह्याची कबुली दिली आहे. संशयिताकडून कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील चेनस्नॅचिंगसह वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा शक्य असल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी सांगितले. चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात आणखी काही संशयिताची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
गुन्ह्यात हस्तगत करण्यात आलेली आलिशान मोटार कोणाच्या मालकीची आहे. संबंधितांचा कृत्यांत सहभाग असावा का, याचीही सखोल चौकशी करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. किराणासह बेकरी दुकानात खरेदीच्या बहाण्याने जायचे, दुकानातील महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची टेहळणी करायची अन् हिसडा मारून दागिन्यांसह क्षणार्धात पसार होण्यात संशयित तरबेज आहेत.
सांगवडे (ता. करवीर), शिरोळ येथील दागिन्यांची चोरी, शाहूपुरी येथील दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात इम्रान मोमीन, सुदाम कुंभार याचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे उघड झाले होते. सहायक निरीक्षक सागर वाघ व पथकाने तावडे हॉटेल ते सांगली फाटा मार्गावर सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तीन गुन्ह्यांची चोरट्यांनी कबुली दिली आहे.
चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या मोटारीसह दुचाकीचा संशयित वारंवार नंबर बदलत होते.शिवाय वेगवेगळ्या स्टीकरचाही खुबीने वापर करीत होते. त्यामुळे संशयित आणि वाहनांचा छडा लावण्यात तपास यंत्रणेसमोर अडचणी निर्माण होत होत्या. सहाय्यक निरीक्षक सागर वाघ,प्रविण पाटील,सुरेश पाटील यांच्या पथकाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर संशयिताची नावे निष्पन्न होताच दोघांना जेरबंद करण्यात आले.