हमीदवाडा: पुढारी वृत्तसेवा
बस्तवडे ग्रामपंचायतीने लावलेले बॅरिकेट्स तोडून अती साहसाने ट्रक पुराच्या पाण्यात घालणे चालकाच्या अंगलट आले. बस्तवडे-आणूर पुलानजीक हा ट्रक पुरात पलटी झाला. सुदैवाने ड्रायव्हर व क्लिनर बचावले आहेत.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज गुरुवारी पहाटे तीनच्या दरम्यान सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुरगुड पोलिसांच्या सूचनेनुसार बस्तवडे पुलाच्या दक्षिणेला बस्तवडे कडील बाजूस लावलेले बॅराकेट तोडून पोल्ट्री खाद्य घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने पूल पार केला.
या ठिकाणी पुलावर किंवा बस्तवडे कडील बाजूस जोडरस्त्यावर पाणी येतच नाही मात्र उत्तरेला आणूरकडील जोड रस्त्यावर पाणी येते. या पाण्यातून पुढे जाताना रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक बाजूच्या चरित गेला व पलटी झाला. यातील ड्रायव्हर व क्लिनर पोहत लगेच त्या उलटलेल्या ट्रकवर चढून बसले. कारण ट्रकचा काही भाग उघडा होता. तिथे उभे राहून त्यांनी बचावासाठी ओरडणे सुरू केले.
नंतर लोक सकाळी फिरायला आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. पोलीस पाटील धनाजी वायदंडे यांनी मुरगुड पोलिसांना ही माहिती देताच दक्षिण बाजूला मुरगुड पोलीस तर उत्तर काठावर कागल पोलीस दाखल झाले.
त्यानंतर बस्तवडे कडील बाजुने कमरेएवढ्या पाण्यातून बस्तवडे येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण यादव, प्रकाश सुतार, हवालदार रवी जाधव, पोलीस पाटील धनाजी वायदंडे यांनी घटनास्थळी जाऊन धाडसाने त्या ट्रकवर अडकलेल्या दोघांना सोडवून पाण्याबाहेर काढले. यावेळी पोलीस हवालदार सतीश वरने, भैरू पाटील, कॉन्स्टेबल रुपेश पाटील यांनी या सर्व बचाव मोहिमेत भाग घेतला.