कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात पांडुरंगाचे भाविक नाहीत का, असा सवाल उपस्थित व्हावा अशी परिस्थिती यावर्षीही निर्माण झाली आहे. आषाढी एकादशीसाठी कोल्हापूर-पंढरपूर मार्गावर विशेष रेल्वेगाडी सोडावी, अशी मागणी असताना यावर्षीही रेल्वेने कोल्हापुरातून विशेष गाडी का सोडली नाही, असा संतप्त सवाल भाविक प्रवाशी करत आहेत. कोल्हापुरातून पंढरपूरसाठी विशेष रेल्वेची गरज आहे. मात्र, रेल्वेने मिरज-पंढरपूर अशा दोन, मिरज-नागपूर आणि मिरज-कुर्डुवाडी अशा चार विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी कोल्हापुरातून कलबुर्गी ही एकमेव गाडी आहे. मात्र, ही गाडी दुपारी सुटत असल्याने गैरसोयीची ठरणार आहे. या गाडीला रेल्वेने पाच जादा डबे कायमस्वरूपी जोडले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा भार काहीसा हलका होईल. मात्र, पंढरपूरला जाणार्यांसाठी ती अपुरी ठरणार आहे. मिरजेहून दि. 24 , 26, 27 जून आणि 1 व 3 जुलै या दिवशी दुपारी चार वाजता मिरज-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार आहे. मात्र, ही गाडी आणि कोल्हापूर-कलबुर्गी या गाडीची मिरजेतील वेळ एकच असल्याने कोल्हापुरातील प्रवाशांना या गाडीचा उपयोग होणार नाही.
दि. 26 व दि. 29 जून रोजी मिरज-नागपूर ही रेल्वेगाडी धावणार आहे. मात्र, ही मिरजेहून दुपारी 12 वाजून 55 मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडीही कोल्हापुरातून मिरजेत जाऊन पकडणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरणार आहे. दि.24 जून ते दि.3 जुलै या कालावधीत दररोज मिरज-पंढरपूर – मिरज ही विशेष गाडी धावणार आहे. याउलट ही गाडी कोल्हापुरातून सोडल्यास त्याचा मोठा फायदा होणार आहे. मिरज-कुर्डुवाडी ही गाडी दि. 24 जून ते 3 जुलै या काळात दररोज दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. या गाडीची वेळही कोल्हापुरातून पंढरपूरला जाणार्या भाविकांसाठी सोयीची ठरणारी नाही. मिरज-पंढरपूर मार्गावर दि.24 जून ते दि. 3 जुलै या कालावधीत पहाटे धावणारी गाडी कोल्हापूरपर्यंत विस्तारित करणे शक्य आहे.