कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा होणार्या पंचगंगा आणि भोगावती नदीतील पाणी पातळी खालावली आहे. या नदीतून पाण्याचा उपसा करणारी शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे शहराच्या बहुतांश भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरात 'पाणीबाणी' निर्माण होणार असून तातडीचा उपाय म्हणून महापालिकेच्या सहा आणि खासगी पाच अशा 11 टँकरद्वारे तीन शिफ्टमध्ये पाणीपुरवठा केला जाणार आहे.
शिंगणापूर बंधारा येथे शिंगणापूर उपसा केंद्र आहे. पंचगंगा नदीतून पाण्याचा उपसा करून बहुतांश शहराला येथून पाणीपुरवठा करण्यात येतो. या केंद्रातील चारही पंप सुरळीत सुरू राहण्यासाठी नदीची पाणी पातळी कमीत कमी 536 मीटर इतकी असावी
लागते. मात्र शनिवारी पाणी पातळी 534 मीटरपर्यंत कमी झाली. त्याबरोबरच भोगावती नदीतील पाणी उपसा करण्यासाठी बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्रे आहेत. तेथे पाणी पातळी 1760 फूट आवश्यक असते. मात्र तेथेही पाणी पातळी 1754 फूटापर्यंत खालावली आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा पूर्ण क्षमतेने होत नसल्याने ते बंद पडले आहेत. त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.
जलसंपदा विभागाने धरणातून पाणी सोडले आहे. मात्र ते पाणी उपसा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 24 तास लागणार आहेत. त्यानंतर पंपिंगद्वारे पाणी उपसा सुरू होईल. फिल्टरकडील पंपिंग सुरू झाल्यानंतर पुईखडी फिल्टर, चंबुखडी येथून शहरात पाणीपुरवठा सुरू होणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. या काळात शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.