गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा
ऊसाने भरलेली ट्रॉली शहरात गजबजलेल्या ठिकाणी चढाला अचानकपणे ट्रॅक्टर पासून बाजूला होऊन मागच्या बाजूला धावल्याने अनेकांना सैरावाला धावावे लागले. या घटनेत केवळ एकाला गंभीर दुखापत झाली केवळ दैव बलवत्तर म्हणून अनेकांचे प्राण वाचले. गडहिंग्लज शहरात गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या घटनेने ऊस वाहतुकीतील धोका दिसून आला. मोठ्या आवाजात लावलेल्या ट्रॅक्टरवरील गाण्यामुळे या चालकाला ट्रॉली तुटून मागे गेल्याचेही लक्षात आले नाही ही सर्वात गंभीर बाब आहे.
याबाबत अधिक माहिती अशी गडहिंग्लज शहरातून सध्या ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सोमवारी एक ट्रॅक्टर ऊस वाहतूक करत असताना कडगाव रोडवरील चढावाला जात होता. याच वेळी त्या ठिकाणी असलेल्या छोट्या स्पीड ब्रेक करून अचानकपणे ट्रॉलीचा हुक तुटला व ट्रॅक्टर तसाच पुढे गेला व ट्रॉली घसाराला वेगाने मागे आली गजबजलेल्या ठिकाणी ही ट्रॉली मागे येत असलेची दिसताच अनेकांची अक्षरश: बोबडी वळली. यातच ट्रॉलीच्या मागे असलेल्या एका दुचाकीस्वराला सदर उलट्या बाजूने ट्रॉलीची धडक बसल्याने तो जखमी झाला.
ट्रॉली जवळपास 20 ते 25 फूट मागे येत बाजूला असलेल्या दहा ते बारा दुचाकीवर घसरून त्यातील ऊस पलटी झाला उपस्थित असलेल्या नागरिकांनी सतर्कता ठेवत बाजूला पळणे पसंत केल्याने अनर्थ टळला. अन्यथा या घटनेत मोठी दुर्घटना घडली असती. ट्रॅक्टर चालकाला मात्र मोठ्या आवाजात सुरू असलेल्या गाण्यांमुळे ट्रॉली मागे सुटल्याचे लक्षातच आले नाही. नागरिकांनी पाठीमागून जाऊन सदरचालकाला जाब विचारल्यानंतर त्याला झालेली घटना लक्षात आली. या ठिकाणी तातडीने पोलीस फौज फाटा दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यास प्रारंभ झाला. शहरांमध्ये घडलेल्या या घटनेची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ट्रॅक्टर मध्ये सुरू असलेल्या मोठ्या आवाजाच्या स्पीकर मुळे काय काय होऊ शकते हे आज दिसून आले असून आता तरी पोलीस या आवाजावर कारवाई करतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. या ट्रॅक्टरच्या मागूनही एक चार चाकी चालक आला होता मात्र ट्रॉली बाजूला होऊन पाठीमागे येत असल्याचे लक्षात येत असल्याने पाठीमागे आपली चार चाकी घेत आपला बचाव केला याशिवाय अन्य लोकांनीही सैरावैरा धावून आपला जीव वाचवला.
अनेक ऊस वाहतूक करणारे चालक ट्रॉली जोडणाऱ्या हुकाकडे दुर्लक्ष करतात त्यामुळेच अशा दुर्घटना घडतात वास्तविक एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक केली जात असताना प्रत्येक ट्रीपला या हुकाकडे ट्रॅक्टर चालकांनी व मालकाने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा अशा सुसाट ट्रॉल्यांमधून होणारे अपघात जिवघेणे ठरु शकतात.