नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार समीर मेघे यांच्याविरोधात माजी मंत्री रमेश बंग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असताना राष्ट्रवादीच्याच उज्ज्वला बोढारे यांची उमेदवारी चिंता वाढविणारी आहे.
(Assembly Election)
ज्यामुळे ‘मविआ’चे जागावाटप रखडले त्या रामटेक विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा शिवसेना-काँग्रेस संघर्ष टोकाला पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीतही त्याची प्रचिती आली. शिवसेना ठाकरे गटाचे पूर्व विदर्भातील एकमेव उमेदवार विशाल बरबटे यांच्याविरोधात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचे निकटवर्तीय राजेंद्र मुळक यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
आता ही मैत्रीपूर्ण लढत सांगली पॅटर्नवर होणार की ‘मातोश्री’ माघार घेत माजी मंत्री सुनील केदार यांचा राजहट्ट पूर्ण करीत काँग्रेसला मदत करणार हे लवकरच कळणार आहे. सध्या दोन्ही बाजूने बैठका जोरात आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे ठाकरे गटाचे पवन जयस्वाल तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे परस्परांविरुद्ध उभे ठाकले आहेत.
दुसरीकडे वरुड मोर्शी मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार आणि भाजपचे उमेश यावलकर स्वगृही परतताच उमेदवार झाले, दोघांकडेही एबी फार्म असल्याने ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. बंडखोरांची संख्या यावेळी वाढली आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले आहे.
दुसरीकडे काँग्रेसने आमच्यात मैत्रीपूर्ण लढती होणार नाही, असा दावा काँग्रेसचे प्रभारी रमेश चैनीथला यांनी केला असून नाराज असलेल्यांची समजूत काढली जाईल, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. अर्थातच या बंडोबांचे बंड चार नोव्हेंबरपर्यंत थंड होणार का, की जो जिंकेल तो आपला या न्यायाने मैत्रीपूर्ण लढती रंगणार हे दिवाळीनंतरच स्पष्ट होणार आहे.