कोल्हापूर

कोल्हापूर : ‘बिद्री’ने वाढविली राजकीय इर्ष्या

दिनेश चोरगे

कोल्हापूर : बिद्री कारखान्याच्या निकालाने या परिसरातील राजकीय इर्ष्या वाढणार आहे. मुळात गेल्या वेळचे विरोधक सत्ताधारी झाले आणि सत्तेतील काहीजण विरोधात गेले. त्याचा परिणाम येणार्‍या सर्वच निवडणुकीत होणार आहे. यापूर्वीच्या निवडणुकीवर राष्ट्रवादी आणि भाजपचा झेंडा फडकला होता. आमदार प्रकाश आबिटकर, खासदार संजय मंडलिक आणि माजी आमदार दिनकरराव जाधव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-शिवसेनेच्या राजर्षी शाहू आघाडीचा धुव्वा उडवून मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी-भाजपच्या श्री महालक्ष्मी आघाडीने सर्व जागांवर बाजी मारली होती. या निमित्ताने भाजपचा सहकारी साखर कारखानदारीत चंचू प्रवेश झाला होता.

मात्र, पाच वर्षांत दूधगंगा-वेदगंगेतून बरेच पाणी वाहून गेले. दिनकरराव जाधव सत्ताधार्‍यांबरोबर आले, तर चंद्रकांत पाटील यांनी थेट मैदानात उतरून हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांना आव्हान दिले. पूर्वीच्या विरोधी पॅनेलमधील आबिटकर, मंडलिक यांना समरजितसिंह घाटगे यांच्याबरोबरच के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांची साथ लाभली. चंद्रकांत पाटील मैदानात उतरूनही भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांच्याबरोबर जाणे पसंत केले. या निवडणुकीत राहुल देसाई निवडून आले आहेत.

प्रकाश आबिटकर यांना कारखान्याच्या सलग दुसर्‍या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. विधानसभेत मात्र त्यांनी सलग दोनवेळा बाजी मारली. आता विधानसभेत त्यांचा सामना कोणाशी होणार याची चर्चा सुरू झाली आहे. के. पी. पाटील हे विरोधकांनी रोखलेल्या इथेनॉल प्रकल्पाचे इरादा पत्र घेण्यसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले होते. बदलत्या राजकीय परिस्थितीत के. पी. पाटील काय निर्णय घेणार याकडे पाहावे लागेल.

'बिद्री'तील विजयाने राधानगरी-भुदरगड मतदारसंघातून विधानसभेचे प्रबळ दावेदार म्हणून ते पुढे आले आहेत. त्याचबरोबर राहुल देसाई भाजपचे जिल्हाध्यक्ष असले तरी देसाई आणि आबिटकर यांच्यात पारंपरिक राजकीय संघर्ष असल्याने तेही कोणती भूमिका घेतात हा चर्चेचा विषय आहे. आता येणार्‍या काळात त्यांच्या राजकीय दिशा स्पष्ट होतील.

ए. वाय. यांना ताकद वाढवावी लागणार

ए. वाय. पाटील यांचा राजकीय फायदा होईल ही आ. प्रकाश आबिटकर यांची अटकळ चुकली आहे. उलट काही ठिकाणी त्यांना कमी मताधिक्य मिळाले. विशेषतः ए. वाय. पाटील यांच्या प्रभाव क्षेत्रातही ते चमक दाखवू शकले नाहीत. त्यामुळे येणार्‍या काळात ए. वाय. पाटील यांना आपली ताकद वाढवावी लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT