आशिष शिंदे
कोल्हापूर : पश्चिम घाटातील डोंगररांगांमध्ये आढळणारी ‘पांगळी’ ही वनस्पती कर्करोग व एचआयव्हीवर रामबाण ठरणार असल्याचे महत्त्वपूर्ण संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधकांनी केले आहे. ‘पोगोस्टेमोन मॉलिश’ अर्थात ‘पांगळी’ या वनस्पतीच्या जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेल्या रेणूस्तरावरील विश्लेषणात 99 जैवसक्रिय संयुगांची ओळख पटली असून त्यात कर्करोगविरोधी कॅम्प्टोथेसिन आणि एचआयव्ही उपचारात वापरले जाणारे झिडोव्हुडिन यांसारखी संयुगे नैसर्गिक स्वरूपात आढळली आहेत. भविष्यात औषध निर्मितीसाठी या वनस्पतीचा वापर केला जाऊ शकतो.
संशोधकांनी केरळमधील पोनमुडी टेकड्यांवरून सुमारे एक हजार 200 मीटर उंचीवरील पांगळी वनस्पती संकलित केली. या वनस्पतीच्या पाने, खोड आणि मुळांचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला. त्यानंतर रेणूस्तरावरील विश्लेषण करण्यात आले. या प्रक्रियेतून 99 जैवसक्रिय घटक ओळखले गेले, तर वनस्पतीच्या सुगंधी तेलात 68 औषधी संयुगांची नोंद झाली. या संयुगांचा मुख्य उपयोग म्हणजे ते शरीरातील पेशींचे नुकसान रोखतात, घातक विषाणूंशी लढतात आणि जुनाट आजारांवरील उपचारांसाठी नैसर्गिक आधार देतात.
पांगळीच्या वाळवलेल्या पानांच्या अर्कात सर्वाधिक रोग प्रतिकारक शक्ती आणि अँटी ऑक्सिडंट क्षमता असते. मानकांप्रमाणे केलेल्या चाचण्यांत (डीपीपीएच, एफआरएपी आणि एबीटीएस), वाळवलेल्या पानांनी 65.1 टक्क्यांपर्यंत शरीरातील घातक फ्री रॅडिकल्स नष्ट करण्याची क्षमता दाखवली. हे संशोधन जागतिक कीर्तीच्या नेचर समूहाच्या सायंटिफिक रिपोर्टस् या शोधपत्रिकेत प्रकाशित झाले आहे. तीन संशोधकांनी हे संशोधन केले असून यात मयूर जाधव यांचा देखील समावेश आहे.
या विश्लेषणात कर्करोग आणि एचआयव्ही विरोधी घटकांसोबतच लुटेओलिन, नेरोलिडॉल, रेझॉल्विन आणि सिनॅपिक अॅसिड यांसारखी औषधीद़ृष्ट्या महत्त्वाची संयुगे ओळखली गेली. सुगंधी तेलात ल्युपेओल आणि कॅरिओफिलीन ऑक्साईड यांसारखी दाहनाशक संयुगे आढळली.
जैवसक्रिय घटक (बायोअॅक्टिव्ह कंपाऊंडस्) म्हणजे वनस्पती, प्राणी किंवा सूक्ष्मजीवांमध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे असे रासायनिक पदार्थ, जे मानवी शरीरातील पेशींवर विशिष्ट आणि सकारात्मक परिणाम करतात. पांगळीसारख्या औषधी वनस्पतींमध्ये आढळणारे कॅम्प्टोथेसिन किंवा झिडोव्हुडिन हे जैवसक्रिय घटक आहेत. कारण ते शरीरात गेल्यानंतर कॅन्सर किंवा व्हायरसच्या पेशींना रोखण्याचे काम करतात.