विशाळगड : सुभाष पाटील
श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुणी ऊन पडे !
व्रतवैकल्ये व सणांची रेलचेल, देव-देव करण्यासाठी बाहेर पडलेले भाविक, उपास-तपांची मांदियाळी अन दुसरीकडे निसर्गाने मुक्त हस्ताने रिता केलेला सौंदर्याचा खजिना असे उत्साहाचे व धार्मिक वातावरण घेऊन श्रावण महिन्याचे आगमन आज (सोमवार) (दि ५) रोजी होत आहे. मराठी महिन्यातील श्रावण महिना म्हणजे धार्मिक कार्याची रेलचेल. या महिन्यात धार्मिक पर्यटनस्थळे, मंदिरे या ठिकाणी मोठी गर्दी असते. (Shravan Somwar 2024)
बारा ज्योतिर्लिंग, ८ अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठे आदी ठिकाणी श्रावण महिन्यात पर्यटकांची गर्दी होते. या मराठी महिन्यात सणांची रेलचेल असते. मंगळागौर, नागपंचमी, नारळीपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, पिठोरी अमावास्या, पोळा, रक्षाबंधन असे आठ सण येतात. हे सण भक्तिभावाने साजरे केले जातात. भारतीय पंचांगानुसार बारा महिने असले तरी सर्वात जास्त व्रत, वैकल्ये श्रावण व भाद्रपद महिन्यात येतात, याची कारणे म्हणजे नैसर्गिक व धार्मिक असे दोन्ही आढळून येतात.(Shravan Somwar 2024)
मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी साजरा करण्यात येतो. सुहासिनी स्त्रीने मंगळागौरीचे पूजन करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. नागपंचमी यमुनेच्या होडात कालिया नावाच्या महाविषारी सर्पाला श्रीकृष्णाने ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी. नागपंचमी या दिवशी नागाची पूजा करून लाह्या व दूध देतात. या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये, विळीने भाजी चिरू नये, तसेच तळने टाळावे टाळवे असे सांगितले जाते. आजही ही प्रथा मोठ्या प्रमाणात पाळली जाते.
नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन समुद्रावर सत्ता चालविणाऱ्या देवास भर्गो, वरूण मित्र म्हणजेच भाग्यदाता. श्रावणातील पौर्णिमेला या वरूणदेवते प्रित्यर्थ समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करावा असे शास्त्र आहे. कारण वरूणदेवता संतुष्ट होऊन नौका, जहाजांना इजा पोहोचवत नाही, अशी सार्वत्रिक भावना व श्रद्धा सुद्धा आहेत. समुद्राला अगस्त ऋषीचा धाक आहे, असे पुराणात म्हंटले आहे. समुद्राला शाप देऊन समुद्र प्राशन केल्याची प्रथा पुराणात आहे. अगस्तीचा तारा आकाशात दक्षिण दिशेला दिसतो, तो तारा आकाशात जोपर्यंत दिसतो तोपर्यंत समुद्र खळखळत नाही असे सांगितले जाते. याच दिवशी रक्षाबंधन सुद्धा येते. बहिणीने आपल्या भावाच्या हातात राखी बांधण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. तिच्या शील रक्षणाची जबाबदारी पुरुषावर येते.(Shravan Somwar 2024)
श्रीकृष्ण जयंती भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण कृष्ण पक्षाच्या अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर झाला. काही प्रांतांत रोहिणी नक्षत्राला महत्त्व देऊन निशीथकालामध्ये ज्या दिवशी रोहिणी नक्षत्र आहे. त्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते. निशीथकाल म्हणजे रात्रीचा आठवा मुहूर्त होय. अंदाजे रात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यानची वेळ होय. या दिवशी मथुरा द्वारका येथे मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात येते व अनेक ठिकाणी गोपाळकाला अर्थात दहीहंडी फोडण्यात येतात. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. स्त्रियांना सौभाग्य, संतती व समृद्धी प्राप्त करून देणारे हे व्रत आहे. या व्रतात ६४ योगिनींची पूजा करावयास सांगितले जाते.(Shravan Somwar 2024)
श्रावण मास आज सोमवार दि ५ ऑगस्ट रोजी सुरू होत असून, सोमवार दि ३ सप्टेंबरला या महिन्याची समाप्ती होत आहे. यंदाच्या श्रावणात पाच सोमवारचा दुर्मीळ योग तब्बल ७१ वर्षांनंतर आला आहे.(Shravan Somwar 2024)